'ट्विस्ट'ने भरलेला 'झूटोपिया २' चर्चेत! भारतात कधी प्रदर्शित होणार? 'या' कारणांमुळे सिक्वेल खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:34 IST2025-11-18T18:33:46+5:302025-11-18T18:34:09+5:30
हा चित्रपट केवळ इंग्रजीतच नव्हे, तर मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

'ट्विस्ट'ने भरलेला 'झूटोपिया २' चर्चेत! भारतात कधी प्रदर्शित होणार? 'या' कारणांमुळे सिक्वेल खास!
'झूटोपिया' (Zootopia) हा एक लोकप्रिय अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट आहे. वॉल्ट डिस्ने अॅनिमेशन स्टुडिओचा हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता या चित्रपटाचा सिक्वेल 'झूटोपिया २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत. 'झूटोपिया २' भारतात कधी प्रदर्शित होणार आणि या सिक्वेलमध्ये काय खास आहे, याबद्दल जाणून घेऊया.
'झूटोपिया २' हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ इंग्रजीतच नव्हे, तर मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिक्वेलमध्ये प्रेक्षकांना अनेक नवे ट्विस्ट आणि दमदार पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुख्य पात्र ज्यूडी हॉप्स हिच्या हिंदीत आवाजासाठी डबिंग केले आहे, ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी हा अनुभव अधिक खास असेल.
'झूटोपिया २' या चित्रपटात ज्युडी हॉप्स आणि निक वाइल्ड एका नवीन आणि रहस्यमय केसचा तपास करताना दिसतात. ते एका अज्ञात ठिकाणी जातात, जिथे त्यांना गॅरी डी'स्नेक नावाचा एक रहस्यमय साप भेटतो. झूटोपोलिस शहराचे नवीन भाग एक्सप्लोर केले जातात आणि शहरात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपस्थितीमागील सत्य उलगडले जाते. 'झूटोपिया' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि आता 'झूटोपिया २' मध्ये कथा, नवी पात्रं आणि ॲक्शनचा डबल डोस आहे. त्यामुळे, 'झूटोपिया'प्रमाणेच 'झूटोपिया २' हा सिक्वेल प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करून बॉक्स ऑफिसवर यश मिळवतो की नाही, हे २८ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लवकरच स्पष्ट होईल.