'द फर्स्ट ओमेन' सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:34 IST2024-03-13T16:34:13+5:302024-03-13T16:34:35+5:30
'द फर्स्ट ओमेन' या हॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याबरोबरच सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'द फर्स्ट ओमेन' सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
हॉलिवूडमधील हॉरर सिनेमा हा कायमच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. अनेक सुपरहिट झालेले भयपट आजही तितकेच लोकप्रिय आहेत. आता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या 'द फर्स्ट ओमेन' या हॉलिवूडसिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याबरोबरच सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'द फर्स्ट ओमेन' या सिनेमाच्या २ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारे सीन्स आहेत. एक तरुण अमेरिकन महिलेला रोममधील चर्चच्या सेवेचे जीवन सुरू करण्यासाठी पाठवतो. तिथे एका भयानक षडयंत्र समोर येते. ज्यामुळे दुष्ट अवताराचा जन्म होण्याची शक्यता असते. त्या महिलेला तिथे जे अनुभव येतात ते थरारकपणे ह्या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची अपेक्षा वाढली आहे.
'द फर्स्ट ओमेन' चित्रपटात नेल टाइगर फ्री हिने मुख्य भूमिका साकारली आहे. याबरोबरच तौफीक बारहोम, सोनिया ब्रागा, राल्फ इनेसन, चार्ल्स डान्स आणि बिल निघी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अर्काशा स्टीव्हन्सनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डेव्हिड एस. गोयर आणि कीथ लेव्हिन यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.