हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विल स्मिथचं मुस्लिम धर्मग्रंथ 'कुराण'बद्दलचं विधान चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:33 AM2024-03-21T10:33:44+5:302024-03-21T10:41:07+5:30

अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये तरबेज असणारं हॉलिवूडमधील नाव म्हणजे 'विल स्मिथ'.

Popular Hollywood actor Will Smith's statement on Muslim holy book Quran | हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विल स्मिथचं मुस्लिम धर्मग्रंथ 'कुराण'बद्दलचं विधान चर्चेत!

हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विल स्मिथचं मुस्लिम धर्मग्रंथ 'कुराण'बद्दलचं विधान चर्चेत!

अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये तरबेज असणारं हॉलिवूडमधील नाव म्हणजे 'विल स्मिथ'.  जगातल्या सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचं नाव येतं. त्याचा अभिनय सर्वांनाच आवडतो. 'बॅड बॉय' आणि 'हाँगकाँग' या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा विल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. आता पुन्हा एकदा विल स्मिथनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  मुस्लिम धर्म ग्रंथ 'कुराण'बद्दल त्यानं केलेलं मोठं विधान सध्या रमजानच्या पवित्र महिन्यात  चर्चेत आलं आहे.  

अभिनेता विल स्मिथच्या एका जुन्या विधानाची खूप चर्चा होत आहे, ज्यामध्ये त्यानं कुराणबाबत मत व्यक्त केलं होतं.  सध्या चर्चेत असलेलं विल स्मिथचं विधान हे त्यानं गेल्या वर्षी दिलं होतं. बिग टाईम पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता की,  'सर्वांना माहिती आहे की, गेली एक-दोन वर्षे माझ्यासाठी अजिबात सोपी नव्हती. या काळात मी अनेक चढउतारांमधून गेलो आहे. यातून मुक्त होण्यासाठी मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असून या संदर्भात मी अनेक पवित्र ग्रंथ वाचले आहेत'.

पुढे तो म्हणाला, 'रमजानच्या शेवटच्या महिन्यात मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुराण वाचलं. मला कुराणातील साधेपणा आवडला आणि तो अगदी स्पष्ट आहे. माझ्या जीवनातील आध्यात्मिक टप्प्याची ही सुरुवात आहे, ज्याद्वारे मी एक प्रेमळ हृदय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे'. सुमारे एक वर्षापूर्वी मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणवर विल स्मिथनं ही प्रतिक्रिया दिली होती.

विल स्मिथ हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असतो. 2022 च्या ऑस्कर पुरस्कारादरम्यान त्यानं मोठा वाद निर्माण केला होता. ऑस्कर सोहळ्यात निवेदक स्टँडअप कॉमेडियन ख्रिस रॉकला थोबाडीत मारल्याप्रकरणी तो वादात अडकला होता. निवेदकानं विलची पत्नी पिंकेट स्मिथवर मजेशीर टिप्पणी केली होती. रॉक बोलत असताना स्मिथ व्यासपीठावर गेला आणि थोबाडीत लगावली. तुझ्या बोलण्यात माझ्या बायकोचा उल्लेख करू नकोस असं स्मिथ म्हणाला होता. पण, वाद निर्माण झाल्यावर त्यानं माफी मागितली होती. 

Web Title: Popular Hollywood actor Will Smith's statement on Muslim holy book Quran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.