Oscar २०२६ मध्ये इराणी चित्रपटांची दमदार एन्ट्री; दिग्दर्शकावर अटकेची टांगती तलवार, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 21:01 IST2026-03-15T20:23:56+5:302026-03-15T21:01:11+5:30
Oscar 2026 : यंदाच्या ऑस्करमध्ये एन्ट्री घेणारे इराणी चित्रपट कोणते? जाणून घ्या...

Oscar २०२६ मध्ये इराणी चित्रपटांची दमदार एन्ट्री; दिग्दर्शकावर अटकेची टांगती तलवार, कारण काय?
Oscar 2026 : जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेला ९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय वेळेनुसार उद्या (रविवार, १६ मार्च) रोजी अमेरिकेत पार पडणार आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून, जागतिक राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉलीवूडसाठीही मोठी परीक्षा मानला जात आहे. यावेळी युद्धाच्या छायेत सापडलेल्या इराणमधील दोन चित्रपट 'Cutting Through Rocks' आणि 'It Was Just an Accident' विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळवत चर्चेत आले आहेत.
इराणी चित्रपटांना ऐतिहासिक नामांकन
इराणी सिनेमासाठी हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. डॉक्युमेंटरी चित्रपट ‘Cutting Through Rocks’ ला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ही ऑस्करमध्ये नामांकन मिळवणारी पहिली इराणी डॉक्युमेंट्री ठरली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पती-पत्नीची जोडी Mohammadreza Eyni आणि Sara Khaki यांनी केले आहे. मात्र देशातील अस्थिर परिस्थितीमुळे या यशाचा आनंदही ते मनमोकळेपणाने साजरा करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘Cutting Through Rocks’ची कथा
‘Cutting Through Rocks’ ही कथा सारा शाहवर्दी नावाच्या एका महिलेभोवती फिरते. त्या व्यवसायाने दाई (मिडवाइफ) असून ग्रामीण भागात मोटरसायकल चालवत महिलांना मदत करतात. समाजातील बंधने तोडत त्यांनी गावातील सरकारी पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्या भागात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. हा संघर्ष केवळ एका पदासाठी नसून महिलांच्या अधिकारांसाठीचा लढा असल्याचे या चित्रपटातून दाखवले आहे.
जाफर पनाहींच्या चित्रपटाचीही चर्चा
इराणचे प्रसिद्ध आणि वादग्रस्त चित्रपट निर्माते Jafar Panahi यांच्या ‘It Was Just an Accident’ या चित्रपटालाही ‘बेस्ट इंटरनॅशनल फिल्म’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट तेहरानमधील एका तुरुंगात छळ केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीचा सामना करणाऱ्या काही लोकांच्या कथेबद्दल आहे.
पनाहींच्या आयुष्यातील संघर्ष
जाफर पनाही यांचा प्रवासही संघर्षांनी भरलेला आहे. चित्रपट निर्मिती आणि परदेश प्रवासावर बंदी असतानाही त्यांनी आपली कलात्मक अभिव्यक्ती थांबू दिली नाही. ‘It Was Just an Accident’ या चित्रपटाने २०२५ मध्ये Cannes Film Festival येथे Palme d’Or पुरस्कार जिंकला होता आणि त्याला चार गोल्डन ग्लोब नामांकनेही मिळाली होती.
ऑस्करनंतर तुरुंगवासाचा धोका?
या चित्रपटामुळे जाफर पनाही यांना १ डिसेंबर २०२५ रोजी इराणमध्ये एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्यांच्यावर देशांतर्गत प्रवासाबाबतही निर्बंध घालण्यात आले आहेत. पनाही यांनी हा चित्रपट इराणमध्येच गुप्तपणे चित्रित केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऑस्कर सोहळ्यानंतर ते इराणला परतल्यास त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केवळ पुरस्कार नव्हे, आवाज जपण्याची लढाई
या पार्श्वभूमीवर ऑस्करच्या मंचावर उभे राहणारे इराणी कलाकार केवळ पुरस्कारासाठी नव्हे, तर आपल्या देशातील संघर्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकांची ओळख जपण्यासाठी आवाज उठवण्यासाठी येत असल्याचे मानले जात आहे. म्हणूनच यंदाचा ऑस्कर सोहळा केवळ सिनेमाचा उत्सव नसून कला, राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा संगम ठरणार आहे.