Video: तब्बल १० हजार फुटांवरुन मारली उडी अन्..; 'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:02 IST2025-05-16T16:01:27+5:302025-05-16T16:02:01+5:30
मिशन इम्पॉसिबल फायनल रेकनिंग सिनेमासाठी टॉम क्रूझने जो जीवघेणा स्टंट केला त्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Video: तब्बल १० हजार फुटांवरुन मारली उडी अन्..; 'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट
जेव्हा अॅक्शन चित्रपटांची गोष्ट निघते, तेव्हा हॉलिवूडमध्ये टॉम क्रूझचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून टॉम क्रूझने अॅक्शनची व्याख्या पुन्हा पुन्हा नव्याने मांडली आहे. टॉमची प्रमुख भूमिका असलेली ‘मिशन: इम्पॉसिबल’ फ्रँचायझी ही अनेक वर्षांपासून हाय-ऑक्टेन थ्रिलचा दर्जा ठरली आहे. या सीरिजचा शेवटचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. त्यानिमित्ताने टॉमने या शेवटच्या सिनेमातही अॅक्शनची कोणतीच कसर बाकी सोडलेली नाही.
१० हजार फुटांवरुन मारली उडी अन्...
‘मिशन: इम्पॉसिबल’ सिनेमाच्या याआधीच्या ‘रॉग नेशन’मध्ये कार्गो विमानाच्या बाहेर लटकणं असो, किंवा ‘फॉलआउट’मध्ये २५००० फूट उंचीवरून केलेली HALO जंप. यामध्ये कित्येक वेळा दुखापतींचा सामना करूनसुद्धा टॉमने अॅक्शनची उंची वाढवली आहे. मिशन: इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’ या चित्रपटासाठी टॉम क्रूझने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात धाडसी स्टंट केला आहे.
एका खास व्हिडीओमध्ये, टॉमने १० हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग केल्याचं उघड झालं आहे. या स्टंटमध्ये कोणतेही डुप्लिकेट कलाकार, कुठलाही शॉर्टकट त्याने वापरला नाही. फक्त खोलवर प्रशिक्षण, अचूक नियोजन आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी अशा तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन टॉमने हा स्टंट केला आहे.
पॅरामाउंट पिक्चर्स प्रस्तुत ‘मिशन: इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’ हा सिनेमा १७ मे २०२५ रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. The Final Reckoning मध्ये इथन हंटला आजवरच्या सर्वात धोकादायक, अत्यंत वैयक्तिक आणि कथानकाच्या दृष्टीने सर्वात गुंतागुंतीच्या मिशनला सामोरं जावं लागतं. एक असं मिशन जे केवळ जागतिक सुरक्षेला नाही, तर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वालाही मुळांपर्यंत हादरवून टाकेल