कर्करोगाशी झुंज अपयशी! ब्रेस्ट कॅन्सरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या ५१व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:37 IST2026-03-23T17:36:47+5:302026-03-23T17:37:15+5:30
हॉरर टेलिव्हिजन सीरिजमध्ये भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कॅरी ऐन हिचं कॅन्सरने निधन झालं आहे.

कर्करोगाशी झुंज अपयशी! ब्रेस्ट कॅन्सरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या ५१व्या वर्षी निधन
हॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्रीचं कॅन्सरने निधन झालं आहे. हॉरर टेलिव्हिजन सीरिजमध्ये भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कॅरी ऐन हिचं कॅन्सरने निधन झालं आहे. ५१व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिडनीमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. जवळपास महिन्याभरानंतर तिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. कॅरी ऐनचा सहकलाकार अभिनेचा जिम बीवर याने तिचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.
कॅरी ऐन ही ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तर कॅरी ऐनच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॅरी ऐनला श्रद्धांजली वाहण्यासाठी लवकरच शोकसभेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कॅरी ऐन फ्लेमिंग हिने वायपर या टीव्ही मालिकेतून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. 'हॅपी गिलमोर' या सिनेमात ती दिसली होती. अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. २००५ साली आलेल्या 'मास्टर्स ऑफ हॉरर' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. यामध्ये तिने विकृत महिलेची भूमिका साकारली होती. 'सुपरनॅचरल', 'द अनऑथराइज्ड फुल हाउस स्टोरी', 'फुल हाउस' या मालिकांमध्ये ती दिसली होती.