लोकप्रिय गायकानं दान केले ५७ लाख रुपये, सगळीकडे होतेय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:14 IST2025-12-04T12:13:08+5:302025-12-04T12:14:43+5:30
लोकप्रिय गायकाने नुकतेच तब्बल ५७ लाख रुपये दान केले आहेत.

लोकप्रिय गायकानं दान केले ५७ लाख रुपये, सगळीकडे होतेय कौतुक
जागतिक स्तरावरील लोकप्रिय गायकाने आपल्या उदारतेने सर्वांची मनं जिंकली आहेत. आपल्या कमाईचा मोठा हिस्सा त्याने सामाजिक कार्यासाठी बाजूला ठेवत एक मोठं पाऊल उचललं आहे. या गायकाने नुकतेच तब्बल ५७ लाख रुपये दान केले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने केलेली ही कृती अत्यंत खास आहे.
जागतिक स्तरावरील लोकप्रिय बँड BTS चा सदस्य जिन याने ही उदारता दाखवली आहे. तो आज ४ डिसेंबर २०२५ रोजी ३३ वा वाढदिवस साजरा करतोय. यानिमित्तानं त्याने १०० दशलक्ष कोरियन वॉन म्हणजेच अंदाजे ५७ लाख रुपये इतकी मोठी रक्कम दान केली आहे. दैनिक जागरणनुसार, गायकानं बुसान नामगवांग सोशल वेलफेअर सोसायटीला ही देणगी दिली आहे, ज्याचा वापर मुलांच्या आणि तरुणांच्या कल्याणासाठी तसेच समाजातील असुरक्षित गटांना मदत करण्यासाठीच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जाईल.
भारतात BTS चा बोलबाला
२०१३ मध्ये स्थापन झालेल्या जिन, जंग कूक, जिमिन, व्ही, आरएम, जे-होप आणि सुगा या सात सदस्यांच्या BTS बँडची भारतातही प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. BTS मुळेच भारतात K-पॉप आणि K-ड्रामाची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी या पुरस्कारासाठी या बँडला दोन वेळा नामांकन मिळालं आहे. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केली असून पॉपविश्वात अनेक विक्रमसुद्धा रचले आहेत. जिनचा सोलो टूर नुकताच संपला आहे आणि तो पुढच्या वर्षी त्याच्या ग्रुपसोबत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. BTS लवकरच मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्ससाठी येऊ शकतं. तब्बल तीन वर्षांपूर्वी BTS ने मुंबईत शो करण्याची घोषणा केली होती, पण आता २०२६ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टूरमध्ये मुंबईचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.