"मी काही मुलींना किस केलं..." लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:10 IST2026-01-12T13:09:48+5:302026-01-12T13:10:33+5:30
लोकप्रिय अभिनेत्रीनं अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

"मी काही मुलींना किस केलं..." लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
टायटॅनिक सिनेमा पाहिला नसलेला क्वचितच एखादा सापडेल. जेम्स कॅमरूनचा टायटॅनिक सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिला. केट विंसलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो स्टार असलेला हा सिनेमा १ नोव्हेंबर १९९७ ला रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर केटच्या अभिनयाची आाणि तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. टायटॅनिकमधील रोझच्या भूमिकेनं जगभरातील चाहत्यांच्या हदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री केट विंसलेट सध्या चर्चेत आली आहे.
केट विंसलेटनं अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की तरुण वयात तिचे महिलांसोबतही इंटिमेट संबंध होते. इतकेच नव्हे तर तिचा पहिला इंटिमेट अनुभवही एका महिलेसोबतच होता. याच अनुभवांमुळे तिला तिच्या पहिल्या 'हेवेन्ली क्रिएचर्स' या चित्रपटमधील भुमिका साकारणे सोपं गेलं. सध्या ५० वर्षांची झालेली केट विंसलेट हिने टीम डीकिन्स पॉडकास्टमध्ये केलेला हा खुलासा चाहत्यांसाठी आश्चर्याचा ठरला आहे.
ऑस्कर विजेती अभिनेत्रीने सांगितले की किशोरवयात आलेल्या वैयक्तिक अनुभवांमुळे तिला पीटर जॅक्सन दिग्दर्शित १९९४ मधील 'हेवेन्ली क्रिएचर्स' या चित्रपटाशी भावनिक नातं जोडता आलं. या चित्रपटात केटने जुलिएटची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये दोन तरुण मुलींमधील तीव्र मैत्री आणि प्रेमाची कथा दाखवलेली आहे. हाच तिचा अभिनय कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता.
केट म्हणाली, "आज मी असं काही शेअर करतेय, जे मी याआधी कधीच सांगितलं नव्हतं. मी खूप लहान असताना माझे काही पहिले इंटिमेट अनुभव मुलींशी होते. मी काही मुलींना किस केलं होतं आणि काही मुलांनाही. पण त्या वयात मी पूर्णपणे समजूतदार नव्हते आणि मला नेमकं काय हवंय हेही ठरवू शकत नव्हते. त्या वयात मी खूप जिज्ञासू होते, त्यामुळे दोन्ही पात्रांमधील खोल नातं समजून घेण्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागली नाही".

'हेवेन्ली क्रिएचर्स' हा केट विंसलेटचा पहिला मोठा चित्रपट ठरला. तिने सांगितले की ऑडिशनपूर्वी तिने कधीच चित्रपटाची स्क्रिप्ट हातात घेतली नव्हती. हा चित्रपट दिग्दर्शक पीटर जॅक्सनसाठीही महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण याआधी ते हॉरर आणि डार्क कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जात होते. हा चित्रपट केट विंसलेटच्या करिअरसाठी निर्णायक ठरला. यानंतर तिने 'सेन्स अँड सेन्सिबिलिटी', 'जूड' आणि 'हॅम्लेट' सारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आणि १९९७ मध्ये 'टायटॅनिक'मुळे ती जगभरात सुपरस्टार बनली.