धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:24 IST2025-11-10T18:24:03+5:302025-11-10T18:24:53+5:30
धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असल्याच्या बातम्यांवर हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वीच धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटवर ठेवलं असल्याचीही बातमी आली. तर दुसरीकडे त्यांच्या टीमने काळजी करण्यासारखं काहीही नाही अशी माहिती दिली. आता काही वेळापूर्वीच धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी हेल्थ अपडेटही दिली.
बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात आहेत. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. तर काही वेळापूर्वीच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या चर्चांवर हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्या म्हणाल्या, "ते लवकर बरे होऊ दे अशी आम्ही सगळेच आशा करत आहोत".
धर्मेंद्र यांच्या टीमने 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार, "धर्मेंद्र हे डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. मात्र चिंता करण्याची काहीही गरज नाही." यासोबतच त्यांच्या टीमने धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना याक्षणी प्रायव्हसी द्यावी अशी विनंती केली आहे. अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात हजर आहे. तसंच त्यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेहून बोलवण्यात आलं आहे.
धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बातम्यांचं टीमने खंडन केलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. त्यामुळे चाहते धर्मेंद्र यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. गेल्यावर्षीच धर्मेंद्र शाहीद कपूर-क्रिती सेननच्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' सिनेमात दिसले होते. तर त्याआधी ते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्येही होते. आगामी 'इक्कीस' सिनेमात ते दिसणार आहेत. अगस्त्य नंदाच्या आजोबांच्या भूमिकेत ते दिसणार आहेत.