प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:56 IST2025-05-27T14:56:06+5:302025-05-27T14:56:25+5:30
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही सुरुवातीच्या काळात निर्मात्याकडून असाच अनुभव आला होता. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता.

प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग
मनोरंजन इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही सुरुवातीच्या काळात निर्मात्याकडून असाच अनुभव आला होता. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यासोबतच या प्रसंगातून स्वत:ची सुटका कशी करून घेतली याबाबतही अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे गुम है किसी के प्यार में फेम ऐश्वर्या शर्मा.
ऐश्वर्या हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. गुम है किसी के प्यार में या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. अनेक मालिकांमध्ये ती दिसली आहे. मात्र, इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात काम करताना ऐश्वर्याला वाईट अनुभव आला होता. ऐश्वर्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत तिने या प्रसंगाबद्दल सांगितलं होतं. ऐश्वर्या म्हणाली, "मुंबईत आल्यानंतर काही वेळ मी मावशीकडे राहत होते. इंडस्ट्रीत करिअर करणं खूप कठीण आहे. खूप ऑडिशन्स देऊनही मला काम मिळत नव्हतं. सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या. मला कास्टिंग काऊचचा सामनाही करावा लागला".
"प्रोड्युसरने मला लोखंडवाला पाठिमागच्या रस्त्याला बोलवलं. मी तिकडे गेले. मी त्याच्या गाडीत बसले. सुरुवातीला तर इकडचं तिकडचं बोलणं झालं. त्यानंतर तो माझ्या जवळ येऊन बसला. त्याने माझ्या केसांतून हात फिरवायला सुरुवात केली. मी त्यांना थांबवलं आणि विचारलं की हे तुम्ही काय करत आहात? तो म्हणाला की कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही. हे ऐकून मी घाबरले. मी गाडीतून उतरून पळायला लागले. रस्त्यात मी रडत होते. मी वडिलांना फोन करून सगळं सांगितलं. ते म्हणाले की घाबरू नकोस आणि अशा लोकांपासून दूर राहा", असंही पुढे ऐश्वर्याने सांगितलं.