Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी
By कोमल खांबे | Updated: October 16, 2025 11:12 IST2025-10-16T11:12:20+5:302025-10-16T11:12:51+5:30
Priya Bapat Diwali Chivda Recipe: दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे

Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी
Priya Bapat Diwali Chivda Recipe: सर्वत्र रोषणाई करणारी आणि आनंद पसरवणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सगळीकडेच दिवाळीची जय्यत तयारी होताना दिसते आहे. घरोघरी फराळाची लगबग सुरू आहे. दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे.
दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. कित्येक कलाकार मोठ्या आवडीने घरच्या घरीच फराळ आणि कंदील बनवतात. प्रिया बापटच्या घरीही दिवाळीची तयारी सुरू आहे. प्रियाने नुकतंच पोह्यांचा चिवडा बनवला. खास आईची रेसिपी ट्राय करून प्रियाने हा चिवडा बनवला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांसोबत पोह्यांच्या चिवड्याची रेसिपीही शेअर केली आहे. व्हिडीओत दिसतंय की प्रिया किचनमध्ये पोह्यांचा चिवडा बनवत आहे.
आधी तिने पोहे थोडेसे भाजून घेतले आहेत. त्यानंतर चण्याची डाळ, ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे तेलातून तळून घेतले आहेत. भाजलेल्या पोह्यांमध्ये मीठ आणि पिठी साखर घातल्याचं प्रियाने सांगितलं. त्यानंतर प्रियाने तेलात तळून घेतलेली डाळ, काजू बदाम आणि शेंगदाणे पोह्यांमध्ये मिक्स केले. मग कढईत तिने मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, हळद आणि धनेपूड याची फोडणी दिली. त्यानंतर पोहे आणि इतर मिश्रण तिने कढईत टाकून ते एकत्रित केल्याचं दिसत आहे. प्रियाच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनीही ही रेसिपी ट्राय करणार असल्याचं म्हटलं आहे.