"कमाईसाठी त्यांनी चित्रपटात..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा YRF च्या स्पाय युनिव्हर्सवर निशाणा, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:13 IST2025-12-24T15:11:51+5:302025-12-24T15:13:21+5:30
टायगर, पठाण हे यशराज स्पाय युनिव्हर्सचे सिनेमे प्रदर्शित झाले होते. धुरंधर अभिनेत्याने आता स्पाय युनिव्हर्सच्या याच सिनेमांवर निशाणा साधला आहे

"कमाईसाठी त्यांनी चित्रपटात..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा YRF च्या स्पाय युनिव्हर्सवर निशाणा, काय म्हणाला?
रणवीर सिंगचा 'धुरंधर' (Dhurandhar) हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर हजार कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अशातच या चित्रपटातील एक अभिनेता अंकित सागरने (Ankit Sagar) शाहरुख खानच्या 'पठाण' आणि सलमान खानच्या 'टायगर' सारख्या स्पाय चित्रपटांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाला अंकित सागर?
एका मुलाखतीत अंकित सागरला विचारण्यात आले की, 'धुरंधर' सिनेमा यशराज फिल्म्सच्या (YRF) स्पाय युनिव्हर्सला टक्कर देऊ शकतो का? यावर उत्तर देताना अंकित म्हणाला, "धुरंधरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट जमिनीवरील वास्तव दाखवतो. खरं तर, खऱ्या आयुष्यात आयएसआय (ISI) आणि रॉ (RAW) एजंट कधीही एकमेकांसोबत नाचणार नाहीत. पण कदाचित व्ह्यूज आणि कमाईसाठी त्यांनी चित्रपटात तसे दाखवले असावे."
अंकितने पुढे सांगितले की, "धुरंधरमध्ये प्रेक्षकांना ते सर्व पाहायला मिळेल जे खऱ्या आयुष्यात घडते. ही स्पाय फ्रँचायझी मोठ्या आणि स्टायलिश चित्रपटांसमोर मजबुतीने उभी आहे कारण ती सत्य घटनांवर आधारित आहे." अंकित सागरने 'धुरंधर'मध्ये जावेद खनानी नावाची महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
अंकित सागरने जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी, त्याचा रोख स्पष्टपणे 'पठाण' आणि 'टायगर ३' कडे होता, जिथे भारत आणि पाकिस्तानचे एजंट एकमेकांना मदत करताना आणि गाण्यांवर डान्स करताना दिसले होते. अंकितच्या या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले असून, काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे तर काहींनी सलमान-शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ रोजी येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.