धर्मेंद्र 'ही-मॅन' कसे झाले? बॉलिवूडच्या आयकॉनला मिळालेल्या उपाधीची अनोखी कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:59 IST2025-11-24T17:58:14+5:302025-11-24T17:59:06+5:30
धर्मेंद्र यांना "ही-मॅन ऑफ बॉलिवूड" ही पदवी कशी मिळाली?

धर्मेंद्र 'ही-मॅन' कसे झाले? बॉलिवूडच्या आयकॉनला मिळालेल्या उपाधीची अनोखी कथा
Interesting Facts About Dharmendra's Career: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज (२४ नोव्हेबर २०२५) अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एक देखणा, दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. धर्मेंद्र यांची अभिनयातील कारकीर्द खूप मोठी आहे. धर्मेंद्र हे पंजाबमधील एका छोट्या गावातून आले आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले. त्यांना "ही-मॅन ऑफ बॉलिवूड" म्हणून ओळखलं जातं. धर्मेंद्र यांना 'ही-मॅन' ही उपाधी कशी मिळाली, याबद्दल जाणून घेऊया.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावात एका जाट शीख कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव धरम सिंह देओल आहे. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती. दिलीप कुमार यांचा शहीद चित्रपट पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला आणि आरशासमोर उभे राहून ते दिलीप कुमार यांच्यासारखे होण्याचे स्वप्न पाहू लागले. त्यानंतर एक टॅलेंट हंट जिंकून धर्मेंद्र चित्रपटांत आले. १९६० मध्ये धर्मेंद्र यांनी 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर काही वर्षांनी ते 'बांदनी', 'हकीकत' आणि इतर काही चित्रपटांत झळकले. हळूहळू विविध भूमिका साकारत ते हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार बनले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
सुरुवातीच्या काळात त्यांनी रोमँटिक भूमिका केल्या. पुढे १९६६ मध्ये 'फूल और पत्थर' हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील खरा टर्निंग पॉईंट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. धर्मेंद्र यांचे खरे स्टारडम या चित्रपटापासून सुरु झाले. या चित्रपटात त्यांचे शर्टलेस अॅक्शन सीक्वेन्स होते. जी त्या काळात एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती. त्यांची तंदुरुस्त शरीरयष्टी, आत्मविश्वास आणि उत्कट ॲक्शन दृश्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली. हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि यामुळे धर्मेंद्र यांची अॅक्शन हिरो म्हणून प्रतिमा मजबूत झाली. त्यांच्या शक्तिशाली शरीरयष्टी आणि उत्साही शैलीमुळे त्यांना "ही-मॅन ऑफ बॉलीवूड" ही पदवी मिळाली. त्यानंतरच्या 'मेरा गाव मेरा देश', 'धरम वीर', 'आग ही आग' आणि 'शोले' सारख्या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा अॅक्शन स्टार म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले होते, "मी शरीर दाखवण्यासाठी नाही, ताकदीच्या भावनांसाठी अभिनय करतो". हीच त्याच्या 'ही-मॅन' प्रतिमेची खरी ओळख ठरली.