Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:10 IST2025-11-24T14:08:29+5:302025-11-24T14:10:56+5:30
धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
Dharmendra Passed Away: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
'इक्कीस' या सिनेमाचा ट्रेलर धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला होता. शेवटच्या सिनेमासाठी केलेली ही पोस्टही त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १९७१च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवलेल्या तरुण सैनिक परमवीरचक्र अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी एम.एल. खेत्रपाल ही भूमिका साकारली होती.
धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.