'दया दरवाजा तोड़ दो' पुन्हा मिळणार ऐकायला, CID मध्ये ACP प्रद्युमन यांचं दमदार कमबॅक! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:05 IST2025-04-12T12:04:46+5:302025-04-12T12:05:19+5:30
सीआयडी (CID) मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत एसीपी प्रद्युमन यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले आणि निर्मात्यांवर नाराज असणारे प्रेक्षक आता या बातमीने खूप आनंदी होतील.

'दया दरवाजा तोड़ दो' पुन्हा मिळणार ऐकायला, CID मध्ये ACP प्रद्युमन यांचं दमदार कमबॅक! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सीआयडी (CID). या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत एसीपी प्रद्युमन यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले आणि निर्मात्यांवर नाराज असणारे प्रेक्षक आता या बातमीने खूप आनंदी होतील. खरंतर, एसीपी प्रद्युमन यांचा मृत्यू झालेला नाही, तर ते लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहेत. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता शिवाजी साटम (Shivaji Satam) सीआयडीमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
टेली चक्करच्या रिपोर्ट्सनुसार, निर्माते एसीपी प्रद्युमनच्या नाट्यमय पुनरागमनाची योजना आखत आहेत. मालिकेच्या चाहत्यांच्या रागामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. खरंतर, एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हे पात्र आणि शिवाजी साटम दोन दशकांहून अधिक काळ सीआयडीशी जोडलेले आहेत. 'दया दरवाजा तोड़ दो' आणि 'कुछ तो गडबड है दया' हे त्यांचे संवाद नेहमीच लोकांच्या तोंडावर असतात.
प्रेक्षक झालेले नाराज
जेव्हा निर्मात्यांनी एसीपी प्रद्युमन यांच्या हत्येचा ट्रॅक दाखवला तेव्हा चाहत्यांनी त्यावर खूप टीका केली. त्यांच्या निधनाने अनेक चाहते भावुक झाले. पण आता लोकांच्या मागणीनुसार, मालिकेत शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युमन यांच्या पुनरागमनासाठी एका खास सीनचा विचार केला जात आहे. शिवाजी साटम यांना त्यांच्या पात्राच्या मृत्यूबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, निर्मात्यांनी त्यांना याबद्दल काहीही सांगितले नव्हते.
पार्थ समथानची मालिकेत एन्ट्री
दरम्यान, नुकताच सीआयडीमध्ये दाखल झालेल्या पार्थ समथानने अलीकडेच सांगितले की, त्याने या मालिकेची ऑफर आधी नाकारली होती कारण तो घाबरला होता. त्याने असेही म्हटले की त्याचे पात्र मालिकेत अनेक ट्विस्ट आणेल आणि एसीपी प्रद्युमनच्या मृत्यूची चौकशी देखील करेल. अभिनेता शिवाजी साटम यांच्याव्यतिरिक्त सीआयडीमध्ये दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, हृषिकेश पांडे आणि अजय नागरथ हे कलाकार आहेत.