अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अनुराग कश्यपची खास भुमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:44 IST2025-05-27T12:43:28+5:302025-05-27T12:44:31+5:30
अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यात शंका नाही.

अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अनुराग कश्यपची खास भुमिका
सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांना केवळ भारतामध्येच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता साऊथ सुपरस्टार अदिवी शेष आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा नवा थरारक अॅक्शन थ्रिलर 'डकैत' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा जबरदस्त असा टीझर प्रदर्शित झाला आहे.
प्रेम, विश्वासघात आणि सूड यांचं चक्रव्यूह असलेल्या 'डकैत'चा टीझर अत्यंत रंजक असा आहे. रिलीज होताच टीझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे. येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार आहे.
शनील देव दिग्दर्शित या चित्रपटातून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तो या सिनेमात खलनायकाच्या भुमिकेत आहे. टीझरमध्ये त्याचं भयानक रूप पाहायला मिळतंय. त्याची प्रत्येक झलक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवते. अनुराग कश्यप शिवाय या चित्रपटात प्रकाश राज, अतुल कुलकर्णी अशा दमदार कलाकारांचा समावेश आहे.
अदिवी शेष आणि मृणालबद्दल बोलायचं झालं तर दोघेही मोठे स्टार आहेत. 'बाहुबली' चित्रपटात अदिवीने भल्लादेवच्या मुलाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली होती. रिअल लाईफ हिरो 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन के यांच्या आयुष्यावरच्या 'मेजर' या चित्रपटात त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. अदिवी शेष हा त्याच्या हँन्डसम लूक आणि अभिनयामुळे चाहत्यांचा लाडका आहे. तर मृणालनं हिंदी टेलिव्हिजन, मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दक्षिणेतही काम केलं आहे. ती लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.