धक्कादायक! बिल्डिंगवरुन पडल्याने ३७ वर्षीय अभिनेत्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:52 IST2025-09-12T13:50:42+5:302025-09-12T13:52:24+5:30
या घटनेने गायक आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. करिअरच्या शिखरावर असताना गायकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली

धक्कादायक! बिल्डिंगवरुन पडल्याने ३७ वर्षीय अभिनेत्याचा जागीच मृत्यू
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. एका ३७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालंय. हा अभिनेता आहे अॅलन यू मेंगलोंग. सुप्रसिद्ध चिनी अभिनेता, गायक आणि मॉडेल अॅलन यू मेंगलोंग (Alan Yu Menglong) याचे ३७ व्या वर्षी बीजिंगमध्ये एका इमारतीवरून पडून निधन झाले. ११ सप्टेंबर २०२५ रोजी ही दुर्दैवी घटना घडली. अॅलनच्या व्यवस्थापन टीमने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक निवेदन जारी करून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली.
गायकाचं ३७ व्या वर्षी दुःखद निधन
अभिनेता - गायक अॅलनच्या व्यवस्थापन टीमने या निवेदनात म्हटले आहे की, "अत्यंत दुःखद भावनेने आम्ही जाहीर करतो की, आमचा प्रिय अॅलन मेंगलोंगचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. पोलिसांच्या तपासणीनुसार, या घटनेत कोणताही गुन्हेगारी कट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, अशी आम्ही आशा करतो. अॅलनच्या चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी या कठीण एकमेकांना साथ द्यावी."
Chinese Actor #YuMenglong Dies at Age 37 After Falling from Building — His Studio Confirms https://t.co/Z499zjr5OZpic.twitter.com/RXmakRk5HP
— DramaPanda (@AsianDramaPanda) September 11, 2025
अॅलन यू मेंगलोंग विषयी थोडक्यात
अॅलन यू मेंगलोंग बद्दल सांगायचं तर त्याचा जन्म १५ जून १९८८ रोजी झाला. २००७ मध्ये 'माय शो, माय शो स्टाइल' या टॅलेंट रिअॅलिटी शोमधून अॅलन यू मेंगलोंगने त्याच्या करिअरची सुरुवात केली. पुढे २०११ साली 'द लिटल प्रिंस' या गाजलेल्या शॉर्ट फिल्ममधून अॅलनने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
याशिवाय 'गो प्रिन्सेस गो' (Go Princess Go) आणि 'इटरनल लव्ह' (Eternal Love) यांसारख्या लोकप्रिय चायनीज वेबसीरिजमध्ये (C-drama) त्याच्या उत्तम अभिनयासाठी तो ओळखला जात होता. अॅलनच्या दुर्दैवी अपघाती निधनाने त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील त्याच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला भावूक श्रद्धांजली वाहिली आहे.