मोठी झाली 'उंच माझा झोका'मधली छोटी रमा, नऊवारी साडी नेसून तेजश्रीने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:09 IST2025-05-27T16:08:39+5:302025-05-27T16:09:07+5:30
तेजश्री मोठी झाली असून तिने नऊवारी साडी नेसून व्हिडिओ शेअर केला आहे.

मोठी झाली 'उंच माझा झोका'मधली छोटी रमा, नऊवारी साडी नेसून तेजश्रीने शेअर केला व्हिडिओ
मराठीतील गाजलेल्या मालिकांमध्ये 'उंच माझा झोका' नाव आवर्जुन येतंच. सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडेंचं बालपण, त्यांचं लग्न, लग्नानंतरचं शिक्षण, नवऱ्याची मिळालेली साथ असे सगळेच घटनाक्रम मालिकेत दाखवले होते. अभिनेत्री तेजश्री वालावलकरने (Tejashree Walavalkar) छोट्या रमाबाईची भूमिका साकारली. तिला या भूमिकेत प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. नऊवारी साडी, डोक्यावर खोपा अशा लूकमध्ये चिमुकल्या रमाने सर्वांचं मन जिंकलं होतं. आता तेजश्री मोठी झाली असून तिने नऊवारी साडी नेसून व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तिने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तेजश्री वालावलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती 'उंच माझा झोका'च्या आठवणींना उजाळा देते. मालिकेचे काही व्हिडिओही शेअर करत असते. नुकतीच ती नऊवारी साडीत नटलेली दिसली. निळी नऊवारी साडी, गळ्यात माळ, सोन्याचे दागिने, नथ अशा सुंदर लूकमध्ये ती तयार झाली. एका मंदिर परिसरातला तिचा हा व्हिडिओ आहे. तेजश्रीच्या या लूकने सर्वांना पुन्हा प्रेमात पाडलं आहे.'झीजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा….अनेक वर्षांनी पुन्हा एकदा नऊवारीत….आणि कानी आली पुन्हा रमा म्हणून हाक…' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
'उंच माझा झोका' नंतर तेजश्री पुन्हा कुठेच दिसली नाही. मधल्या काळात ती कुठे गायब होती याचं उत्तर तिने नुकतंच एका मुलाखतीत दिलं होतं. ती म्हणाली, "रमाबाईंची इमेज सर्वांच्या मनात इतकी ठसली होती की तेजश्री म्हणजे रमाबाई असे लोकांचे झाले होते. कुठेतरी हे थांबायला हवे असे वाटत होते. तसंच मी तेव्हा लहानही होते. त्यामुळे काहीतरी काम करायचं म्हणून जी भूमिका मिळतेय ती करू असं मला करायचं नव्हतं. मी जाणूनबुजून ब्रेक घेतला. माझ्या आवडत्या भूमिकेतून मला परत एकदा पुढे यायचे होते. त्या भूमिकेच्या मी प्रतीक्षेत होते. आता लवकरच आपली भेट होईल."