सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:46 IST2025-11-25T14:41:54+5:302025-11-25T14:46:41+5:30
सेलिना जेटलीने १५ वर्षांनंतर पतीवर लावले आरोप, मुंबईत परतली; तीनही मुलं अजून पतीसोबत ऑस्ट्रियातच

सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
अभिनेत्री, माजी मिस इंडिया सेलिना जेटलीने पती पीटर हागवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. पती विरोधात तिने केस दाखल केली असून मुंबई न्यायालयात दाद मागितली आहे. सेलिनाने पतीवर कौटुंबिक हिंसाचार, क्रूरता, शारिरीक, मानसिक छळाचा आरोप केला आहे. सेलिनाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने ऑस्ट्रियाचा नागरिक पीटर हागला नोटीस पाठवली आहे.
सेलिना जेटलीने करंजवाला अँड कंपनी लॉ फर्मच्या माध्यमातून पीटर हागविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत अनेक आरोप लावले आहेत. ४७ वर्षीय अभिनेत्रीला मानसिक, शारिरीक, सेक्शुअल, व्हर्बल गैरवर्तनाचा सामना करावा लागला आहे. यामुळेच तिला ऑस्ट्रियातील घर सोडून भारतात यावं लागलं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पीटर हागने ऑस्ट्रियातील एका न्यायालयात अर्ज केला होता असं सेलिनाने याचिकेत म्हटलं आहे. सेलिनाने ५० कोटी रुपये भरपाई आणि महिन्याला १० लाखांचा मेंटेनन्सची मागणी केली आहे. तसंच तिने आपल्या तीनही मुलांना भेटण्याची परवानही मागितली आहे जे सध्या ऑस्ट्रियामध्ये वडिलांसोबत राहत आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.
सेलिनाने १८ सप्टेंबर २०१० रोजी पीटर हागसोबत रजिस्टर मॅरेज केलं होतं. २०१२ मध्ये सेलिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतर २०१७ मध्ये तिला पुन्हा जुळी मुलं होणार होती. मात्र त्यातील एकाच मृत्यू झाला. लेकाच्या मृत्यूमुळे सेलिना नैराश्यात गेली होती. तिच्या आईवडिलांचंही ठराविक काळाने एकामागे एक निधन झालं. अशा परिस्थितीत पती पीटरने सेलिनावर मुंबईतील घर आपल्या नावावर कर असा दबाव दिला. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात असल्याची बातमी आली. भावाला सोडवण्यासाठी सेलिनाने भारताकडे मदत मागितली. या सगळ्यात आता सेलिना घटस्फोटामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या १५ वर्षांनी तिने पतीवर आरोप लावले आहेत.