वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:03 IST2025-12-29T10:00:27+5:302025-12-29T10:03:00+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंधेरी येथील मालकीच्या भूखंडाची विक्री तब्बल ८५५ कोटी रुपयांना केली. सुमारे अडीच एकर जागेचा हा भूखंड आहे...

वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
मनोज गडनीस -
मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट उद्योगात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली असून, यामध्ये बॉलिवूड कलाकारांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बॉलिवूड कलाकारांनी वर्षभरात एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल केल्याची आकडेवारी पुढे आली आहे. या एक हजार कोटींमध्ये एकरकमी ८५५ कोटी रुपयांचा व्यवहार करत अभिनेते जितेंद्र हे अव्वल ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंधेरी येथील मालकीच्या भूखंडाची विक्री तब्बल ८५५ कोटी रुपयांना केली. सुमारे अडीच एकर जागेचा हा भूखंड आहे. जितेंद्र यांची कन्या व निर्मात्या एकता कपूर यांनी वरळी येथील आलिशान फ्लॅटची विक्री १२ कोटी २५ लाख रुपयांना केली. अक्षय कुमार यांनी वरळी, बोरिवली व लोअर परळच्या आठ मालमत्तांची ११० कोटी रुपयांना विक्री केली आहे. अभिनेते ऋतिक रोशन व कुटुंबीयांनी ८० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. वरुण धवन यांनी जानेवारीत दोन आलिशान फ्लॅटची ८० कोटींना खरेदी केली.
बिग बी दुसऱ्या क्रमांकावर
जितेंद्र यांच्यानंतर बॉलिवूडमधील बिग-बी अमिताभ बच्चन यांनी या वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीचे एकूण १४० कोटी रुपयांचे व्यवहार केले. जानेवारी महिन्यात अमिताभ यांनी अंधेरी येथील त्यांच्या फ्लॅटची विक्री ८३ कोटी रुपयांना केली. हा फ्लॅट त्यांनी २०२१ मध्ये ३१ कोटींना खरेदी केला होता.
बच्चन यांनी अयोध्येमध्ये २५ हजार चौरस फूट आकारमानाचा भूखंड ४० कोटी रुपयांना खरेदी केला; तर ऑक्टोबरमध्ये अमिताभ यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे तीन भूखंडांची खरेदी ६ कोटी ५९ लाख रुपयांना केली. तसेच, नोव्हेंबर महिन्यात त्यांनी मुंबईच्या गोरेगाव येथील दोन फ्लॅटची विक्री १२ कोटी रुपयांना केली.