"तूच माझं प्रेम आणि तूच माझ्या..."; जिनिलियाने रोमँटिक पोस्ट शेअर करत रितेशला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:37 IST2025-12-17T13:37:08+5:302025-12-17T13:37:37+5:30
Genelia Dsouza-Deshmukh And Riteish Deshmukh : जिनिलियाने रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोमँटिक फोटो पोस्ट करत एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

"तूच माझं प्रेम आणि तूच माझ्या..."; जिनिलियाने रोमँटिक पोस्ट शेअर करत रितेशला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं आणि आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा-देशमुख ओळखले जातात. आज, १७ डिसेंबर रोजी रितेश देशमुखचा वाढदिवस असून, या खास दिनी जिनिलियाने सोशल मीडियावर त्यांच्यातील प्रेमाची झलक शेअर केली आहे. जिनिलियाने रितेशसोबतचे काही अत्यंत रोमँटिक आणि सुंदर फोटो पोस्ट करत एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जिनिलियाने सोशल मीडियावर रितेशसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, "माझा प्रिय रितेश, जे लोक आपल्याला ओळखतात त्यांना नेहमीच प्रश्न पडतो की, इतक्या वर्षांनंतरही आपण एकमेकांपासून वेगळे का होऊ शकत नाही आणि तरीही इतके आनंदी कसे आहोत? पण सत्य हे आहे की, हे सर्व फक्त तुझ्यामुळेच शक्य आहे."
तिने पुढे लिहिले, "तू माझं प्रेम आहेस, तू शालीनता आहेस. तू मला हसवतोस आणि जर कधी माझ्या डोळ्यात पाणी आले, तर तू प्रत्येक अश्रू पुसतोस. तुझ्याकडे लोकांसोबत नातं जोडण्याची एक अप्रतिम कला आहे. जो कोणी तुझ्या सहवासात येतो, त्याला स्वतःचे महत्त्व पटते. मग विचार कर, मला तर तुझा सहवास २४ तास मिळतो, तर मग मला त्या सोन्याचं हृदय असलेल्या माणसाकडून काय काय अनुभवायला मिळत असेल! मी तुला दररोज, दर मिनिटाला आणि दर सेकंदाला सेलिब्रेट करेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हृदयाची धडधड! माझं हृदय तुझ्याकडेच आहे, फक्त ते सुरक्षित ठेव." तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रितेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
रितेश आणि जिनिलिया केवळ वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर व्यावसायिक आयुष्यातही एकमेकांना खंबीर साथ देतात. रितेश सध्या त्याच्या ऐतिहासिक भव्य चित्रपटासाठी चर्चेत आहे. तो 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत प्रदर्शित होणार आहे. तर बऱ्याच काळानंतर जिनिलियाने 'वेड' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर यशस्वी पुनरागमन केले. सध्या ती दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील काही निवडक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तिने रितेशच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या निर्मितीची धुराही सांभाळली आहे. यासोबतच ती विविध ब्रँड्स आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते.