यामी गौतम व इमरान हाश्मी यांचा 'हक' चित्रपट घरबसल्या पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:40 IST2025-12-15T11:37:14+5:302025-12-15T11:40:27+5:30
सिनेमागृहात जाऊन चित्रपट न पाहता आलेले प्रेक्षक हा सिनेमा आता घरबसल्या पाहू शकतील.

यामी गौतम व इमरान हाश्मी यांचा 'हक' चित्रपट घरबसल्या पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या
अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत असलेला कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'हक' (Haq) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुपन वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एका अत्यंत वादग्रस्त आणि ऐतिहासिक खटल्यावर आधारित असल्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला होता.
'हक' या चित्रपटाची कथा शाह बानो बेगम यांच्या वास्तविक जीवनातील संघर्षापासून प्रेरित आहे. शाह बानो या इंदूरच्या एक घटस्फोटित मुस्लिम महिला होत्या. ज्यांनी १९८५ च्या 'शाह बानो खटला'मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोटगीसाठी लढा दिला होता. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी 'हक' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनापूर्वीच त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला.
शाह बानोच्या कायदेशीर वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. हा कोर्टरूम ड्रामा मुस्लिमांच्या भावना दुखावतो, असा त्यांचा दावा होता. अनेक कायदेशीर अडचणी असूनही हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही.
बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे, आता 'हक' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा हा कोर्टरूम ड्रामा २ जानेवारी २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. तथापि, ओटीटी रिलीजची ही तारीख अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे निश्चित केलेली नाही.