सैफ अली खानच्या घरालाच का टार्गेट केलं हल्लेखोरानं? समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:49 IST2025-01-20T12:48:15+5:302025-01-20T12:49:07+5:30
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सैफ अली खानच्या घरालाच का टार्गेट केलं हल्लेखोरानं? समोर आलं कारण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)च्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी बांगलादेशी आहे. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हल्लेखोराला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे. हल्लेखोर आरोपीने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने चौकशीदरम्यान सांगितले की, तो १२वी पास आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. सूत्रांनी असा दावा केला की आरोपी सध्या बेरोजगार असून त्याला बांगलादेशात परत जायचे आहे, ज्यासाठी त्याला ५०,००० रुपयांची गरज होती, त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला.
सैफचे घर का केले टार्गेट?
सूत्रांनी पुढे सांगितले की, त्याने सैफ अली खानच्या इमारतीला टार्गेट केले कारण त्याच्या लक्षात आले की सर्व गेट्सवर कोणतीही सुरक्षा नाही आणि आत प्रवेश करणे सोपे आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा गुन्हा केल्यानंतर आरोपी गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता आणि तेथून बांगलादेशला पळून जाण्याची योजना आखत होता. त्याचा प्लॅन अंमलात आणण्यापूर्वीच तो ठाण्यात पकडला गेला.
काय आहे संपूर्ण प्रकरण
सैफ अली खानची स्टाफ नर्स एलियामा हिने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार तिने हल्लेखोराला बाथरूममधून बाहेर येताना पाहिले. हल्लेखोराने नर्सला गप्प राहण्याची धमकी दिली आणि एक कोटी रुपयांची मागणीही केली. एफआयआरनुसार, या वेळी हल्लेखोर करीना-सैफचा धाकटा मुलगा जेहच्या दिशेने गेला होता, ज्याला वाचवण्यासाठी एलियामा जखमी झाली होती. आरडाओरडा ऐकून सैफ अली खान तेथे पोहोचला. तेव्हा त्याने हल्लेखोराचा सामना केला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने ६ वार केले, ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याची प्रकृती आता सुधारत आहे. मात्र, या घटनेनंतर ७२ तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली.