Raaj Kumar : ‘जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगेगा....’, राज कुमार बोलले आणि तसंच घडलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:00 AM2022-07-08T08:00:00+5:302022-07-08T08:00:02+5:30

Raaj Kumar : पडद्यावर राज कुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. चाहते त्यांच्यावर फिदा होते. पण राज कुमार या जगातून गेले ते अगदी गुपचूप...

When Raaj Kumar Not Want People From Bollywood To Attend His Funeral | Raaj Kumar : ‘जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगेगा....’, राज कुमार बोलले आणि तसंच घडलं...!!

Raaj Kumar : ‘जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगेगा....’, राज कुमार बोलले आणि तसंच घडलं...!!

googlenewsNext

मोठ्या रुबाबात पडद्यावर त्यांची एन्ट्री व्हायची आणि मग त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. इतक्या की अख्खं थिएटर दणाणून जायचं. आम्ही बोलतोय ते जानी... अर्थात राज कुमार  यांच्याबद्दल. पडद्यावर राज कुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. चाहते त्यांच्यावर फिदा होते. पण राज कुमार या जगातून गेले ते अगदी गुपचूप. होय, अतिशय गुप्तपणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतका मोठा स्टार जगाला अलविदा म्हणून आपल्यातून निघून गेला, हे तो अनंताच्या प्रवासाला निघून गेल्यावर लोकांना कळलं....

जानी अभी पहना लो हार... जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगे....
डायरेक्टर मेहुल कुमार यांनी ‘मरते दम तक’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यानचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. अखेरचा शॉट राज कुमार यांच्या अंत्यसंस्काराचा होता. खंडाळ्यात हॉटेल फरियाजच्या बाहेर शूट सुरू होतं.  शॉट  संपला आणि राज कुमार यांनी दिग्दर्शक मेहुल यांना जवळ बोलावलं. माझ्यावर हार चढवं, असं ते म्हणाले. मेहुल यांनी नकार दिला. पण राज कुमार जिद्दीला पेटले. मेहुल यांनी याबद्दल सांगितलं होतं की, राज कुमार व्हॅनमध्ये लेटलेले होते आणि मी त्यांच्यावर हार चढवला. राज कुमार हसले आणि जानी अभी पहना लो हार, जब जाएंगे तुम्हें पता भी नहीं लगेगा..., असं ते म्हणाले. आपकी लंबी उम्र हो, फक्त एवढंच मी त्यावेळी बोलू शकलो होतो. पण राज कुमार यांच्या त्या वाक्यानं मी अस्वस्थ झालो होतो. पॅकअप झाल्यावर मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं. यावर, जानी तुमको मालूम नही श्मशान यात्रा को तमाशा बना देते है फिल्म लाईन में. लोग सफेद कपडों में और फिर प्रेस के लोग भी.. मेरा अंतिम संस्कार मेरी फॅमिली के लिए होगा... मेरी फॅमिली के अलावा कोई इसे अटेंड नहीं करेगा.., असं ते मला म्हणाले होते.

राज कुमार म्हणाले होते तसंच घडलं....

राज कुमार यांनी अनेक डायलॉग अजरामर केले. त्यांच्या आवाजातील डायलॉग ऐकणं म्हणजे, एक वेगळीच अनुभूती होती. प्रेक्षक त्यांच्या याच आवाजाचे फॅन होते. पण दुर्दैव म्हणजे, हाच आवाज कॅन्सरनं क्षीण केला. होय, आयुष्याच्या अखेरच्या काळात राज कुमार यांना घशाचा कॅन्सर झाला होता. यामुळे आवाज गेला होता, शरीर खंगलं होतं. मृत्यूनंतर राज कुमार यांच्यावर अत्यंत गुप्त पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे उपस्थित होते. कारण खुद्द राज कुमार यांनीच मृत्यूपूर्वी तसं सांगून ठेवलं होतं.  

आपल्या आजारपणाबद्दल कोणालाही कळू नये, अशी राज कुमार यांची इच्छा होती. राजकुमारला घशाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं, त्या काळात त्यांना खाण्यापिण्यापासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती, अशा परिस्थितीतही  आपल्या आजाराबद्दल कोणालाही कळू नये अशी त्यांची इच्छा होती.  3 जुलै 1996 रोजी राज कुमार यांनी जगाला निरोप घेतला. विशेष म्हणजे, मृत्यूची चाहूल त्यांना आधीच लागली होती. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना बोलावलं.  ‘मी आज रात्री निघून जाईल आणि माझ्या मृत्यूची बातमी माझ्यावर अंतिम संस्कार झाल्यावरच सगळ्यांना सांगा. मृत्यूनंतर मला जाळून टाका. माझ्या मृ:त्यूबद्दल कोणालाही माहिती देऊ नका’, असं त्यांनी सांगितलं . त्यांच्या याच अंतिम इच्छेखातर त्यांच्यावर अगदी गुप्तपणे अंतिम संस्कार झाले. राज कुमार यांना खोटी सहानुभूती नको होती. बॉलिवूडचा दिखाऊपणा त्यांना सहन व्हायचा नाही. त्यांनी कधीच मीडियाला मुलाखत दिली नाही. कदाचित मृत्यूचा तमाशा होऊ नये, हीच त्यांची इच्छा असावी....
 

Web Title: When Raaj Kumar Not Want People From Bollywood To Attend His Funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.