वरण भात, कढी म्हणजे गरिबांचं जेवण...; महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केल्यानं विवेक अग्निहोत्री ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:19 IST2025-08-18T17:14:09+5:302025-08-18T17:19:42+5:30
विवेक अग्निहोत्रींनी मराठी लोकांच्या जेवणाची गरिबीसोबत तुलना केल्याने त्यांच्याविरोधात नाराजीचे सूर उमटले आहेत. जाणून घ्या काय म्हणाले?

वरण भात, कढी म्हणजे गरिबांचं जेवण...; महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केल्यानं विवेक अग्निहोत्री ट्रोल
'द काश्मिर फाईल्स', 'द व्हॅक्सीन वॉर' यांसारख्या संवेदनशील-सामाजिक सिनेमांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. विवेक कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच विवेक यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यात विवेक यांनी महाराष्ट्रीयन जेवण आणि खाद्यपदार्थांना गरीबांचं जेवण म्हटल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे विवेक यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. काय म्हणाले होते विवेक?
विवेक यांनी महाराष्ट्रीयन पदार्थांना ठेवली नावं
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत विवेक यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या, "महाराष्ट्रीय जेवणाविषयी सांगायचं तर मी जे काही बनवायची ते यांना अजिबात आवडायचं नाही. काय तुम्ही लोक गरिबांचं खाणं खाता, असा विचार ते करायचे. मराठी पदार्थ खूप साधे असतात. आम्हीत कमीत कमी तेलाचा वापर करुन पदार्थ बनवतो आणि खातो. हे गरीबांचं जेवण आहे, हे गरीबांचं जेवण आहे, असं ते कायम मला सांगत आले आहेत."
यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, "मी मूळचा दिल्लीचा आहे. तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी असे पदार्थ मिळतात. त्या पदार्थांवर मसाले असतात, वरती तेल आणि तूप असतं. मग ही मला म्हणाली, तू वरणभात खा. नवीन लग्न झालं होतं म्हटलं ठीकेय, खाऊया. मग ती म्हणाली कढी खा. आता कढी म्हणजे मला वाटलं होतं, त्यावर तूप तरंगत असेल, लाल मिरची असेल. मराठी लोकांची कढी तुम्ही खाल तर असं वाटतं की, हेल्थ फूडसारखी आहे. हा सांस्कृतिक फरक होता. हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब खाणं झालं."
अशा शब्दात विवेक यांनी त्यांचं वक्तव्य केलं. विवेक यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठी जेवणाला गरीब म्हटलं, याशिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसोबत जेवणाची तुलना केल्याने विवेक यांच्या मानसिकतेवर नेटकऱ्यांनी प्रहार केले आहेत