विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:34 IST2025-12-16T14:34:33+5:302025-12-16T14:34:52+5:30
प्रेमानंद महाराजांचे शब्द ऐकून अनुष्का शर्माचे डोळे पाणावले, विराटच्या साधेपणानं चाहत्याचं मन जिंकलं

विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
Virat Kohli Anushka Sharma Vrindavan : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा वृंदावनमध्ये पोहचले आहेत. आज मंगळवार १६ डिसेंबर रोजी त्यांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचा प्रेमानंद महाराजांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी अनुष्का शर्मा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते.
कपाळावर चंदनाचा टिळा लावून हे स्टार जोडपे एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे जमिनीवर बसून महाराजांचं मोलाचं प्रवचन ऐकताना पाहायला मिळालं. प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्का यांना सांगितलं की, "तुमच्या कामाला सेवा समजा, गंभीर व्हा, नम्र व्हा आणि देवाचे नाव घ्या. खऱ्या सुखासाठी देवाला शरण जाणे आवश्यक आहे".
महाराजांचे हे शब्द ऐकून अनुष्का भावुक झाली आणि म्हणाली, "आम्ही तुमचे आहोत, महाराजजी". यावर महाराजांनी अत्यंत प्रेमाने उत्तर दिले की, "आपण सर्व श्रीजींचे (राधारानीचे) आहोत. आपण सर्व त्यांचीच मुले आहोत आणि त्यांच्याच संरक्षणाखाली आहोत". यावेळी प्रेमानंद महाराजांच्या प्रत्येक शब्दावर विराट कोहली अगदी भक्तीभावानं मान डोलवत सहमती दर्शवताना पाहायला मिळाला.
याआधीही मुलांसह घेतले आशीर्वाद
विशेष म्हणजे, प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाची त्यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी वृंदावनाला भेट दिली होती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी वामिका आणि धाकटा मुलगा अकाय. हे जोडपे अनेकदा त्यांच्या मुलांना घेऊन वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी गेले आहेत. वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचं आश्रम आहे. लाखो भाविक त्यांना फॉलो करतात.