विकी कौशल करणार आणखीन एका बायोपिकमध्ये काम, पहा First Look
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 13:46 IST2019-06-27T13:43:33+5:302019-06-27T13:46:15+5:30
उरी फेम अभिनेता विकी कौशल लवकरच सरदार उधम सिंह यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्यात आता त्याची आणखीन एका बायोपिकमध्ये वर्णी लागली आहे

विकी कौशल करणार आणखीन एका बायोपिकमध्ये काम, पहा First Look
उरी फेम अभिनेता विकी कौशल लवकरच सरदार उधम सिंह यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्यात आता त्याची आणखीन एका बायोपिकमध्ये वर्णी लागली आहे. तो देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आलाय. या बायोपिकचं नाव सैम असं आहे.
सैम बायोपिकमधील विकी कौशलचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात तो हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसतो आहे. या बायोपिकचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. आधी या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता हे स्पष्ट झालंय की विकी कौशल रुपेरी पडद्यावर मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणारेय आणि या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत.
विकी कौशलने यापूर्वी २०१८ साली आलिया भट अभिनीत राझी चित्रपटात मेघना गुलजारसोबत काम केलेले आहे. मेघना गुलजारने सांगितलं की, राझीच्या शूटिंगदरम्यान त्यांनी विकी कौशलसोबत सैम मानेकशॉ यांच्या कथेवर चर्चा केली होती. चित्रपटाचा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर विकीला स्क्रीप्ट वाचायला सांगितली. विकी कौशलचं म्हणणं आहे की, त्याने जेव्हा १९७१ साली भारत-पाकिस्तानच्या युद्धाबाबत वाचले होते त्यावेळी मानेकशॉ यांच्या धाडसी व शूरतेबद्दल समजलं होतं.
सैम मानेकशॉ १९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी देशाचे सेनाप्रमुख होते. मानेकशॉ पहिले सेनाध्यक्ष होते ज्यांना फिल्ड मार्शलचे पद दिले होते.
२७ जूनला सैम मानेकशॉ यांची पुण्यतिथी असून या निमित्ताने चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.