"मी फक्त त्या क्षणाची वाट पाहतोय..."; लवकरच बाबा होणाऱ्या विकी कौशलने व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:17 IST2025-10-15T12:16:14+5:302025-10-15T12:17:39+5:30
पहिल्यांदाच विकी कौशलने वडील होण्याचा आनंद व्यक्त केलाय.

"मी फक्त त्या क्षणाची वाट पाहतोय..."; लवकरच बाबा होणाऱ्या विकी कौशलने व्यक्त केला आनंद
Vicky Kaushal Reacts To Katrina Kaif's Pregnancy: बॉलिवूड कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. कतरिना आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी क्यूट फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. सध्या कौशल कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. आता पहिल्यांदाच विकी कौशलने वडील होण्याचा आनंद व्यक्त केलाय.
विकी कौशल नुकताच मुंबईत आयोजित झालेल्या एका 'युवा' संमेलनात सहभागी झाला होता. तिथे निखिल तनेजासोबत संवाद साधताना त्याने बाबा होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं. विकीला बाबा होण्याबद्दल तुला कोणत्या गोष्टीची जास्त उत्सुकता आहे, असं विचारलं. त्यावर विकी म्हणाला, "फक्त बाबा होणं हीच. खरंच मी खूप उत्सुकतेनं मी फक्त त्या क्षणाची वाट पाहतोय. मला वाटतं हा खूप मोठा आशीर्वाद आहे. लवकरच हे होणार आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करतोय. मला तर असं वाटतंय की, मी घराबाहेर जाणारच नाही".
कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील एका पॅलेकमध्ये त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. दोघांनी आजपर्यंत एकत्र एकही सिनेमा केलेला नाही. मात्र खऱ्या आयुष्यात ते प्रेमात पडले आणि त्यांनी थेट लग्न केलं. विशेष म्हणजे कतरिना विकीहून ५ वर्षांनी मोठी आहे. कतरिना शेवटची गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या श्रीराम राघवन दिग्दर्शित "मेरी ख्रिसमस" या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात दिसली होती, ज्यात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होता. आता तिचे चाहते तिच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कतरिनाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे.