खरा महाराष्ट्रीयन कोण असतो? विकी कौशलचं उत्तर चर्चेत; मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:47 IST2026-03-12T10:45:39+5:302026-03-12T10:47:10+5:30
विकी कौशलला नुकताच 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर २०२६- अभिनेता' हा पुरस्कार मिळाला आहे.

खरा महाराष्ट्रीयन कोण असतो? विकी कौशलचं उत्तर चर्चेत; मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा
विकी कौशल हा बॉलिवूडचा सुपरस्टार. २०२५ मध्ये 'छावा' सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये हे वर्ष चांगलंच गाजवलं आहे. 'छावा'मध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकी कौशल मराठी चांगलं बोलताना दिसतो. तो अनेकदा महाराष्ट्राचा कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणून आदराने उल्लेख करत आला आहे. अशातच विकीनं खरा महाराष्ट्रीयन कोण असतो? यावर दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
विकी कौशलला यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकीला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - अभिनेता' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विकी कौशलला 'तुझ्या मते खरा महाराष्ट्रीयन कोण?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अतिशय सुंदर उत्तर देताना विकी म्हणाला, "ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतो, तो प्रत्येक व्यक्ती खरा महाराष्ट्रीयन आहे".
ऐतिहासिक भूमिकांबद्दल बोलताना विकीने सांगितले की, त्याला अशा थोर नेत्यावर किंवा व्यक्तिमत्त्वावर मराठी चित्रपट करायला आवडेल जे 'अनसंग हिरो' (ज्यांच्याबद्दल जगाला फारशी माहिती नाही) असतील. "छत्रपती शिवाजी महाराज तर संपूर्ण जगाला माहीत आहेतच, पण आमची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही जगासमोर यावा. तसंच अजूनही असे अनेक शूरवीर आहेत ज्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, अशा विषयावर काम करायला मला आवडेल", असे त्याने सांगितले.
विकीनं मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मराठी सिनेसृष्टीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना विकीने सांगितले की, त्याला मराठी सिनेमे खूप आवडतात. आवडत्या दिग्दर्शकांबद्दल विचारले असता त्याने नागराज मंजुळे आणि अविनाश अरुण या दोन दिग्गज नावांचा उल्लेख केला. या दिग्दर्शकांसोबत भविष्यात काम करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच स्वीकारेन, असे त्याने म्हटले.