वरूण धवनला मोठा धक्का, ड्रायव्हरचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 11:01 IST2022-01-19T10:51:08+5:302022-01-19T11:01:45+5:30
Varun Dhawan's driver dies : वरूण शूटींगमध्ये बिझी होता आणि त्याचा ड्रायव्हर मनोज नेहमीप्रमाणे शूटींग संपण्याची वाट पाहत होता. त्याचवेळी अचानक..

वरूण धवनला मोठा धक्का, ड्रायव्हरचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) सध्या मोठ्या धक्क्यात आहे. काल त्याच्या ड्रायव्हरचा अचानक मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो वरूणसोबत वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत होता.
मंगळवारी वरूण धवन मेहबूब स्टुडिओत एका जाहिरातीच्या शूटींगमध्ये बिझी होता. त्याचा ड्रायव्हर मनोज साहू यानेच वरूणला मेहबूब स्टुडिओत सोडलं होतं. वरूण शूटींगसाठी आत गेला आणि मनोज नेहमीप्रमाणे शूटींग संपण्याची वाट पाहत स्टुडिओच्या आवारात थांबला होता. त्याचवेळी अचानक मनोजला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वरूणला हे कळताच, तो बाहेर धावत आला. त्याने व त्याच्या टीमने मनोजला लीलावती रूग्णालयात दाखल केलं.. परंतु तिथे मनोजला मृत घोषित करण्यात आलं.
वरुण आणि मनोज यांच्यात फारच खास बॉन्डिंग होतं. तो नेहमीच वरुणसोबत असे. अनेकदा वरुणने मीडियासमोर मनोजचं कौतुक केलं आहे. मनोज साहू हा गेल्या 25 वर्षांपासून धवन कुटुंबाचा ड्रायव्हर होता. आधी तो वरूणचे पिता डेव्हिड धवन यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर तो वरूणचा ड्रायव्हर बनला होता.
अचानक घडलेल्या या घटनेनं वरुणाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावल्याने अभिनेता फारच दु:खी आहे. वडील डेव्हिड धवन यांनी वरुण धवनशी संवाद साधून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं. मनोजच्या अकाली निधनानं त्याचं कुटुंब पोरकं झालं आहे. अशात धवन कुटुंबानं मनोजच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवल्याचं कळतंय.