CoronaVirus : वरूण धवनच्या जवळच्या नातेवाईकालाही कोरोनाची बाधा, गंभीर आहे प्रकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 16:30 IST2020-04-12T16:30:00+5:302020-04-12T16:30:02+5:30
धक्कादायक

CoronaVirus : वरूण धवनच्या जवळच्या नातेवाईकालाही कोरोनाची बाधा, गंभीर आहे प्रकृती
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आता हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलेय, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता वरूण धवन याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, वरूणच्या एका जवळच्या नातेवाईकालाही कोरोनाने ग्रासले आहे. यामुळे वरूणचे कुटुंब सध्या प्रचंड चिंतेत आहे.
लाईव्ह चॅटदरम्यान वरूणने हा खुलासा केला. त्याने सांगितले की, जोपर्यंत आपल्या जवळच्यावर बेतत नाही, तोपर्यंत आपल्या स्थितीचे गांभीर्य कळत नाही. कोरोनाबाबतही असेच आहे. ही एक जीवघेणी महामारी आहे. आमच्या अमेरिकेतील एका जवळच्या नातेवाईकाला कोरोना झाल्याचे कळल्यापासून आम्ही सगळेच चिंतीत आहोत. त्यांची प्रकृती तूर्तास गंभीर आहे.
या जीवघेण्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे सोशल डिस्टेंसिंग, असेही वरूण म्हणाला. केवळ इतकेच नाही तर घरात राहात, सुरक्षित राहा़ कारण हाच या महामारीवरचा उपाय आहे, असेही वरूण म्हणाला.
यापूर्वी लाईव्ह चॅटवर वरूणसोबत त्याची बालपणीची मैत्रिण व अभिनेत्री जोया मोरानीही दिसली होती. जोया स्वत: कोरोना पॉझिटीव्ह आहे. तीच नाही तर तिची बहीण आणि वडिलांनाही कोरोनाने ग्रासले आहे. सध्या या तिघांवरही रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
तूर्तास महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस शंभर रुग्णांची भर पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतील ११३ रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. या आकडेवारीतून करोना फास आवळत असल्याचे दिसून येत आहे.