'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरने सोडला अभिनय? बॉलिवूडला रामराम ठोकल्याच्या चर्चांवर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:59 IST2025-12-21T18:54:35+5:302025-12-21T18:59:33+5:30
'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडला रामराम ठोकला? अभिनेत्री म्हणाली "मी माझ्या कामाच्या बाबतीत..."

'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरने सोडला अभिनय? बॉलिवूडला रामराम ठोकल्याच्या चर्चांवर म्हणाली...
Urmila Matondkar : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी 'रंगीला गर्ल' अर्थात उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे उर्मिलाने अभिनय सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता त्यांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, ५१ वर्षीय उर्मिलाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, ती अभिनयापासून दूर गेलेली नाही आणि लवकरच एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
चित्रपटांपासून ब्रेक घेतल्याच्या अफवांवर उत्तर देताना उर्मिला म्हणाली, "मी माझ्या कामाच्या बाबतीत नेहमीच निवडक राहिले आहे. जर कोणाला वाटले असेल की मी आता चित्रपट करणार नाही, तर मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. मात्र, तसे कधीच नव्हते. मी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्यास पूर्णपणे तयार आहे". पुढे ती म्हणाली, "आता सेटवर परतण्याची वेळ आली आहे. मला अशा भूमिका करायच्या आहेत, ज्या मी यापूर्वी कधीही केल्या नाहीत".
'बालकलाकार' ते 'इंडस्ट्रीची क्वीन'
उर्मिलाचा बॉलिवूडमधील प्रवास थक्क करणारा आहे. तिने १९७७ मध्ये 'कर्मा' चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. 'कर्मा'शिवाय 'जाकूल','मासूम','सूर संगम','भावना','बडे घर की बेटी','तुम्हारे शहर','डकैत' या सिनेमांमध्येही ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली. १९७७ ते १९८८ पर्यंत ती १० सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं. १९८९ साली ती मल्याळम सिनेमातही झळकली. हिंदी आणि साउथ मिळून ती ६० सिनेमांमध्ये दिसली आहे.
१९९१ साली उर्मिलाने सनी देओलच्या 'नरसिम्हा' सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. तिचे 'रंगीला', 'सत्या', 'खूबसूरत', 'दीवाने','हसीना मान जाएगी','भूत' असे अनेक सिनेमे गाजले. उर्मिला मध्यंतरी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. १० वर्ष छोट्या मोहसीन अख्तरसोबत लग्न आणि मग घटस्फोट यामुळे ती प्रसिद्धीझोतात होती. आज वयाच्या ५१ व्या वर्षी उर्मिला ग्लॅमरस दिसते. ती शेवटची २०२२ मध्ये 'डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स' या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली होती. आता ती अभिनेत्री म्हणून पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे.