आमिर खान नाही, आता 'हा' अभिनेता साकारणार उज्ज्वल निकम यांची भूमिका, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:23 IST2025-04-21T10:23:19+5:302025-04-21T10:23:46+5:30
आमिर खानच्या एक्झिटनंतर आता अष्टपैलू अभिनेता उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार आहे.

आमिर खान नाही, आता 'हा' अभिनेता साकारणार उज्ज्वल निकम यांची भूमिका, जाणून घ्या...
Ujjwal Nikam Biopic: देशातील बहुतांश महत्त्वपूर्ण खटल्यात समर्थपणे सरकारी बाजू मांडणारे उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच येणार आहे. या चित्रपटात "मिस्टर परफेक्शनिस्ट" म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) उज्ज्वल निकम यांची भुमिका साकारणार होता. पण, आता या चित्रपटातून आमिर खानचा पत्ता कट झाला आहे. उज्ज्वल निकम यांची भुमिका आमिर खान साकारणार नाही. आमिर खानच्या एक्झिटनंतर आता एका अष्टपैलू अभिनेत्याच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मिड-डेच्या वृत्तानुसार, उज्ज्वल निकम यांच्या या बायोपिकचं दिग्दर्शन दिनेश विजान करणार आहेत. त्यामुळं दिनेश विजान यांनी त्यांचा आवडता अभिनेता अर्थात राजकुमार रावची (Rajkummar Rao) उज्ज्वल निकम यांच्या भुमिकेसाठी निवड केली आहे. यासंदर्भात दिनेश हे राजकुमार राव चर्चा करणार आहेत. पण, सध्या राजकुमार राव हा सध्या दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तो उज्ज्वल निकम यांच्या या बायोपिकसाठी होकार देतो की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, आमिर खान आता उज्ज्वल निकम यांची भुमिका साकारणार नसला तरीही तो या बायोपिकचा भाग राहणार आहे. आमिर खान निर्माता म्हणून या चित्रपटाचा भाग असल्याची चर्चा आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते मुळचे जळगावचे आहेत. उच्चशिक्षित आणि वकिली वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर जळगाव येथेच त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उज्ज्वल निकम यांच्या स्वत:च्या नावे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण २७ कोटी ७० लाख ७१ हजार ९८३ रुपये संपत्ती आहे.
उज्ज्वल निकम यांनी १९९३ चा बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २००८ मधील २६/११ मुंबई हल्ला, २०१६ च्या कोपर्डी बलात्कार प्रकरण, अशा अनेक भारतातील सर्वात वादग्रस्त आणि हाय प्रोफाईल प्रकरणात दमदार भूमिका निभावली आहे. उज्ज्वल निकम हे जो खटला हातात घेतात त्यातला एकही आरोपी सुटत नाही, असं बोललं जातं. बऱ्याचदा निकम यांना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. अशी सुरक्षा मिळणारे निकम हे देशातील एकमेव वकील आहेत. त्यांच्या बायोपिकमध्ये वकिलीतील स्पर्धा, कायद्यातील खाचखळगे, वकिलांवर येणारी संकटे, वकिलांबाबत सरकारचे धोरण, त्यातील विसंगती अशा विविध गोष्टी चित्रपटातून मांडण्यात येतील. लवकरच त्यांच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात होईल.