तृप्ती डिमरीने खरेदी केली आणखी एक महागडी गाडी; किती कोटी मोजले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:33 IST2025-05-27T14:33:31+5:302025-05-27T14:33:42+5:30
अभिनेत्री तृप्ती डिमरीचं जणू नशीब फळफळलंय.

तृप्ती डिमरीने खरेदी केली आणखी एक महागडी गाडी; किती कोटी मोजले?
अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) बहुचर्चित अशा 'अॅनिमल' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आली आणि लोकांची आवडती बनली. 'अॅनिमल' या सिनेमात तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीन दिला होता. तृप्तीने 'अॅनिमल'च्याही आधी 'बुलबुल','लैला मजनू', 'कला' या सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारली होती. पण 'अॅनिमल' मधील न्यूड सीनमुळेच तिची सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली. या सिनेमानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले. ती अलीकडेच 'भूल भूलैय्या ३' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या सिनेमांमध्ये दिसलेली. आता अभिनेत्री 'धडक २'मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय आणि तिच्या हाताला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'स्पिरिट' चित्रपट लागल्याचं बोललं जातंय. करिअरनं एवढी झेप घेताच तिने एक महागडी गाडी खरेदी केल्याचे समोर आलं आहे.
तृप्ती डिमरीने पोर्श कार खरेदी केली आहे. निळ्या रंगाची ही आलिशान कार घेऊन ती मुंबईतील रस्त्यांवर धावताना दिसली. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. गाडीमधून खाली उतरताना तिचा एक व्हिडीओ समोर आला असून चाहते नवी कार घेतल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीनं या कारसाठी तब्बल २.११ कोटी रुपये मोजले आहेत.
प्रभाससोबत 'स्पिरिट'मध्ये झळकणार तृप्ती
केवळ आलिशान गाडीच नव्हे, तर तृप्ती डिमरीने नुकताच सुपरस्टार प्रभाससोबत 'स्पिरिट' हा मोठा चित्रपट साइन केल्याचं अधिकृतपणे समोर आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. म्हणजेच 'अॅनिमल'नंतर तृप्ती आणि संदीप हे आणखी एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहेत. या सिनेमात आधी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला कास्ट करण्यात आलं होतं. पण, दीपिकाने खूप जास्त मानधन मागितल्याने तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तिच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळेच वांगा यांनी तिला सिनेमातून बाहेर काढल्याचं बोललं जात आहे.
'स्पिरिट' हा सिनेमा हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 'स्पिरिट'मध्ये सामाजिक न्याय, कायद्याचा प्रभाव, आणि व्यक्तिगत संघर्ष यांचा सुरेख मिलाफ दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट टी-सिरीज बॅनरखाली भूषण कुमार यांच्याकडून निर्मित होत आहे. अभिनेता प्रभास 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष'सारख्या सिनेमांनंतर आता 'स्पिरिट'साठी सज्ज झाला. हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.