"आज राम, उद्या रावण बनेल...", 'रामायण'मधील रणबीर कपूरच्या कास्टिंगवर सद्गुरू यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:29 IST2025-10-30T15:28:39+5:302025-10-30T15:29:25+5:30
Ranbir Kapoor : रणबीर कपूर सध्या नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटावर काम करत आहे, यात तो भगवान श्री रामांची भूमिका साकारणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीरच्या निवडीवर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

"आज राम, उद्या रावण बनेल...", 'रामायण'मधील रणबीर कपूरच्या कास्टिंगवर सद्गुरू यांची प्रतिक्रिया
अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. त्याचे हे दोन भागांत प्रदर्शित होणारे चित्रपट पुढील दोन वर्षांत रिलीज होतील. रणबीर भगवान रामाची भूमिका करत असल्याने अनेक लोक टीका करत आहेत. मात्र, आता अध्यात्मिक गुरु सद्गुरू यांनी रणबीरच्या बाजूने मत मांडले आहे.
रणबीर कपूर सध्या नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटावर काम करत आहे, यात तो भगवान श्री रामांची भूमिका साकारणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीरच्या निवडीवर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रणबीर कोणत्याही देवाच्या भूमिकेसाठी योग्य नाही, असा दावा हे लोक करत असतानाच, आता आध्यात्मिक गुरु सद्गुरू यांनी अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे.
''त्याने रावण साकारला तर?''
अलीकडेच चित्रपट निर्माता नमित मल्होत्रा यांच्याशी झालेल्या संवादात सद्गुरू यांनी या वादावर चर्चा केली आणि रणबीर कपूरवर होणारी टीका चुकीची असल्याचे सांगितले. नमित यांनी म्हटले, ''लोक त्याच्या (रणबीरच्या) भूतकाळातील गोष्टी काढून विचारत आहेत की रणबीर कपूर रामायणात श्री रामचे पात्र कसे साकारू शकतो?'' यावर बोलताना सद्गुरू म्हणाले, ''हे एका कलाकाराबद्दल चुकीचे आहे, कारण त्याने भूतकाळात कोणत्या ना कोणत्या रूपात अभिनय केला आहे. तुम्ही त्याला राम होण्याची अपेक्षा करू शकत नाही? उद्या तो दुसऱ्या चित्रपटात रावणाची भूमिका साकारू शकतो.''
यशच्या भूमिकेवर सद्गुरू म्हणाले...
सद्गुरू यांनी रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशच्या निवडीबद्दलही चर्चा केली. ''यश एक सुंदर माणूस आहे,'' असे ते म्हणाले. यावर नमित यांनीही सहमती दर्शवत म्हटले, ''यश एक खूप सुंदर माणूस आणि देशातील एक खूप प्रतिभावान सुपरस्टार आहे. आम्हाला रावणाचे सर्व पैलू, त्याची भक्ती, त्याची खोली दाखवायची आहे आणि हे फक्त यशच करू शकतो.''