रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 19:07 IST2023-05-25T19:06:49+5:302023-05-25T19:07:24+5:30
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे

रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री
करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. 'मिट दि रंधवास' अशी ओळख करून देणाऱ्या या पोस्टरमध्ये रणवीर सिंग,धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबतच एक मराठी चेहरा झळकत आहे. हा चेहरा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग. या चित्रपटात क्षिती एका महत्वपूर्ण आणि रंजक भूमिकेत दिसणार आहे.
इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती म्हणते, अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली.
ती पुढे म्हणाली की,' धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती.' येत्या २८ जुलै रोजी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.