ही एक सवय संजीव कुमार यांच्या जीवावर बेतली, 'शोले'च्या 'ठाकूर'ने वयाच्या ४७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:18 IST2025-10-17T16:16:35+5:302025-10-17T16:18:19+5:30
Sholey Movie : 'शोले'मध्ये 'ठाकूर'ची दमदार भूमिका साकारणारे संजीव कुमार यांचं वयाच्या ४७व्या वर्षी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचा जीव कोणत्या सवयीमुळे गेला, हे त्यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी नुकतेच सांगितले आहे.

ही एक सवय संजीव कुमार यांच्या जीवावर बेतली, 'शोले'च्या 'ठाकूर'ने वयाच्या ४७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
१९६० साली रिलीज झालेल्या 'हम हिंदुस्तानी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता संजीव कुमार यांनी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी 'निशान', 'अली बाबा और ४० चोर', 'स्मगलर', 'राजा और रंक' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले, परंतु रमेश सिप्पी यांच्या 'शोले' चित्रपटातील 'ठाकूर'च्या भूमिकेसाठी ते आजही ओळखले जातात. संजीव कुमार यांचं वयाच्या ४७व्या वर्षी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचा जीव कोणत्या सवयीमुळे गेला, हे त्यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी नुकतेच सांगितले आहे.
मात्र, १९६० ते १९८४ या काळात एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संजीव कुमार यांचे निधन फार लवकर झाले. अवघ्या४७ व्या वर्षी ते आपल्या चाहत्यांना दुःखी करून या जगातून निघून गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी संजीव कुमार यांना हृदयविकाराचा झटका येण्यामागचे कारण सांगितले. एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, 'थ्री इडियट्स' आणि 'पीके' सारख्या चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते परीक्षित साहनी यांनी नुकतेच त्यांच्या जवळच्या मित्राची आठवण काढत अनेक किस्से सांगितले. या मुलाखतीत त्यांनी त्या कारणाबद्दलही सांगितले, ज्यामुळे त्यांना त्यांचा जवळचा मित्र इतक्या कमी वयात गमवावा लागला.
परीक्षित साहनी म्हणाले...
संजीव कुमार यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल खुलासा करताना परीक्षित साहनी म्हणाले, "त्याच्यामध्ये अनेक वाईट सवयी होत्या. जसे की, शूटिंगनंतर तो खूप दारू प्यायचा. तो फक्त पीतच राहायचा. रात्री २ वाजेपर्यंत तो खातच असायचा. तो खायचे आणि हाडे टेबलखाली फेकून द्यायचा. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, म्हणजेच त्याला हृदयविकाराचा झटका आला."
संजीव कुमार यांच्यावर फिदा होत्या अनेक अभिनेत्री
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव कुमार यांचे प्रेम जीवनही त्यांच्या काळात खूप चर्चेत होते. असे म्हटले जाते की, त्यांना हेमा मालिनी यांना आपली पत्नी बनवायचे होते, पण तसे होऊ शकले नाही, त्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा विचार करणे सोडून दिले. संजीव कुमार यांच्या प्रेम जीवनाबद्दल विचारले असता, परीक्षित साहनी म्हणाले, "मी त्याला याबद्दल कधीच विचारले नाही, पण मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. मी मुलींची नावे घेणार नाही, कारण त्यांच्यापैकी काही अभिनेत्री होत्या. अनेक जणी त्याच्यासाठी वेड्या होत्या आणि त्यांना त्याच्याशी लग्न करायचे होते, पण त्याला कोणाशीही लग्न करायचे नव्हते."
परीक्षित साहनी यांनी हे देखील सांगितले की, जेव्हा ते ६ वर्षे रशियामध्ये राहून भारतात परतले आणि त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात आले, तेव्हा त्यांची हिंदी खूपच खराब होती, पण हरी भाई उर्फ संजीव कुमार यांनी त्यांना भाषा शिकण्यास मदत केली. दोघांनी एकत्र 'अनोखी रात' चित्रपटात काम केले होते