"ज्या कलाकारांना काम दिलं, त्यांनी यश मिळताच...", अभिनेते मनोज कुमार यांना या गोष्टीची वाटायची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:56 IST2025-04-04T13:55:50+5:302025-04-04T13:56:21+5:30
Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

"ज्या कलाकारांना काम दिलं, त्यांनी यश मिळताच...", अभिनेते मनोज कुमार यांना या गोष्टीची वाटायची खंत
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८७व्या वर्षी शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठे योगदान आहे. त्यांनी केवळ अप्रतिम चित्रपटच बनवले नाहीत तर अनेक स्टार्सच्या करिअरलाही आकार दिला.
मनोज कुमार यांनी त्यांच्या 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना मोठा ब्रेक दिला होता. स्मिता पाटील यांच्या टॅलेंटला ओळख मिळाली. मात्र, कोणत्याही अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीचे श्रेय दिले नाही, याबद्दल मनोज कुमार यांना नेहमीच खंत वाटत असे. एका जुन्या मुलाखतीत सुभाष के झा यांच्याशी बोलताना मनोज कुमार म्हणाले की, जेव्हा कलाकार यशस्वी झाल्यानंतर मुलाखतीत त्यांचा उल्लेख करत नसत तेव्हा त्यांना वाईट वाटायचे.
मनोजकुमार यांना व्हायचं दुःख
बॉलिवूड इंडस्ट्रीत एकटेपणा वाटतो का असे विचारल्यावर मनोज कुमार म्हणाले, 'मी याबद्दल फारसा विचार करत नाही. पण ज्या अभिनेत्यांना मी मोठ्या संधी दिल्या आणि त्यांनी माझा उल्लेखही केला नाही अशा अभिनेत्यांच्या मुलाखती मी वाचतो तेव्हा वाईट वाटते.
स्मिता पाटील यांना दिली होती ऑफर
मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिभावान कलाकारांसोबत काम केले आहे. ते म्हणाले की, 'मी टॅलेंट ओळखतो. तुम्हाला माहिती आहे का की, शर्मिला टागोर यांनी माझा शोर हा चित्रपट सोडला तेव्हा त्या माझ्या पत्नीची भूमिका करणार होत्या, जी शेवटी नंदा यांनी साकारली होती. ती भूमिका मी स्मिता पाटील यांना ऑफर केली होती. त्यावेळी मला अभिनयात रस नव्हता असे त्यांनी अतिशय नम्रपणे सांगितले होते.
या सिनेमांनी बनवलं 'भारत कुमार'
मनोज कुमार यांचे 'शहीद' (१९६५), 'उपकार' (१९६७), 'पूरब और पश्चिम' (१९७०), आणि 'रोटी कपडा और मकान' (१९७४) यांसह अनेक लोकप्रिय चित्रपट आहेत. या सिनेमांमुळे त्यांना 'भारत कुमार' हे नाव पडले.