"अशोभनीय आणि बेताल पद्धतीने...", तब्बू कुणावर भडकली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:44 IST2025-01-23T13:44:36+5:302025-01-23T13:44:55+5:30
जाहिर माफी मागावी, अशी मागणी तब्बूनं केली आहे.

"अशोभनीय आणि बेताल पद्धतीने...", तब्बू कुणावर भडकली?
तब्बू (Tabu) ही बॉलिवूडमधली ऑल टाईम सुपरहिट अभिनेत्री आहे. वयाची पन्नाशी पार केली आहे, पण आजही तिच्या अभिनयाला आणि केमिस्ट्रीला तोड नाही. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तब्बूदेखील आपल्या चाहत्यांशी कायम जोडलेली असते. चाहते आणि मीडिया यांच्यासोबत तिचं चांगलं नात आहे. तब्बूचा तसा रागीट स्वभाव नाही, तिला कधी कुणावर ओरडतानाही पाहिलेलं नाही. पण, आता अशी घटना घडली आहे, ज्यामुळे अभिनेत्राचा (Tabu Gets Angry False Marriage Rumours) सयंम तुटल्याचं पाहायला मिळालं आहे.
तब्बू मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तबू आणि तिच्या लग्नाविषयीच्या बातम्यांना जणू उत आला आहे. एका वेबसाईटनं तिच्या बाबतीत वृत्त प्रकाशित केलं होतं. ज्यात तब्बूनं "मला लग्नात अजिबात रस नाही. मला फक्त माझ्या बेडवर पुरुष हवा" असं म्हटल्याचं छापलं होतं. यावरून तब्बू संतापली आहे. तब्बूच्या टीमने निवेदन जारी करत संताप व्यक्त केला. तसेच संबंधित वेबसाईटसने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार तब्बूच्या टीमने निवेदनात म्हटलं, 'अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडलवर तब्बूच्या नावाने चुकीचे विधान अशोभनीय आणि बेताल पद्धतीने छापलं आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, अभिनेत्रीने असं काहीही म्हटलेलं नाही. प्रेक्षकांची दिशाभूल केली जात आहे आणि हे नैतिकतेचे गंभीर उल्लंघन आहे. ही खोटी वक्तव्ये त्वरित काढून टाकावीत आणि त्यांच्या कृत्यांसाठी आमची औपचारिक माफी मागावी'.
तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तरी नुकतीच हॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. ड्यून प्रॉफेसी सिनेमात तिने काम केलं. लवकरच ती २५ वर्षांनंतर अक्षय कुमारसोबत 'भूत बंगला' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रियदर्शन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याआधी तब्बू आणि अक्षय कुमार 'हेरा फेरी' चित्रपटात एकत्र दिसले होते.