सुशांतच्या निधनानंतर ६ वर्षांनी वडिलांचा मोठा निर्णय! केली 'ही' घोषणा; चाहत्यांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:56 IST2026-01-23T15:51:16+5:302026-01-23T15:56:40+5:30
सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. तो आता ४० वर्षांचा असता.

सुशांतच्या निधनानंतर ६ वर्षांनी वडिलांचा मोठा निर्णय! केली 'ही' घोषणा; चाहत्यांचे डोळे पाणावले
आपल्या अभिनयाने आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आठवण आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. २१ जानेवारी रोजी सुशांतच्या जयंतीनिमित्त, त्याचे वडिल कृष्ण कुमार सिंह यांनी मुलाच्या आठवणीत "सुशांत सिंह राजपूत मेमोरियल क्लब अँड फिल्म डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट" स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
सुशांतला कला, विज्ञान आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड होती. त्याची हीच आवड आणि स्वप्ने पुढे नेण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. ही संस्था अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करेल. विशेषतः बिहारमधील आणि कला क्षेत्रात रस असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. या संस्थेचे मुख्य कार्यालय बिहारमधील पाटणा येथील कंकरबाग हाऊसिंग कॉलनीमध्ये सुरू करण्यात आले आहे.
सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, "सुशांतची विचारसरणी आणि त्याची सर्जनशीलता सदैव जिवंत राहावी, यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. येथे विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील". या संस्थेच्या संस्थापक सदस्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांसह तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे.
ऐन उमेदीत, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना सुशांतने जगाचा निरोप घेतला. १४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरुंगवासही झाला, मात्र पुराव्याअभावी तिला निर्दोष मुक्त करण्यात आले. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. सीबीआयने मार्च २०२५ मध्ये बंद केलेला तपास आत्महत्या असल्याचे सांगत बाह्य हस्तक्षेपाचा पुरावा नसल्याचे म्हटले होते.