३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:56 IST2025-12-11T12:56:33+5:302025-12-11T12:56:57+5:30
गोविंदा आणि सुनीताला टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. पण, त्यांच्या एका मुलीचा जन्म होताच मृत्यू झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीताने याबद्दल सांगताना दु:ख व्यक्त केलं.

३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत. सुनीता आणि गोविंदा गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहतात. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण दोघांनी दिलं होतं. गोविंदा आणि सुनीताला टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. पण, त्यांच्या एका मुलीचा जन्म होताच मृत्यू झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीताने याबद्दल सांगताना दु:ख व्यक्त केलं.
सुनीताने उषा काकडे यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या मुलाखतीत सुनीताला आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, "माझी दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती. ८व्या महिन्यात तिचा जन्म झाला होता. तिच्या फुप्फुसांची नीट वाढ झाली नव्हती. तीन महिने मी तिला सांभाळलं. एके रात्री तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि माझ्या कुशीतच तिने जीव सोडला. माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता. आज माझ्या दोन मुली आणि एक मुलगा असता. मी दुसऱ्यांदा गरोदर होते तेव्हा गोविंदासोबत खूप जास्त ट्रॅव्हल करत होते. पहिल्या डिलिव्हरीला मला त्रास झाला नाही. त्यामुळे मला असं वाटलेलं की दुसरीही होऊन जाईल. पण, तसं झालं नाही".
गोविंदाला मुलगा हवा होता, असा खुलासाही सुनीताने एका मुलाखतीत केला होता. इट ट्रॅव्हल रिपीटला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली होती की "जेव्हा मला यश झाला तेव्हा माझं वजन १०० किलो इतकं झालं होतं. माझं वजन खूप वाढलं होतं. मला वाटलं होतं की मी मरुन जाईन. मला पाहून गोविंदा रडायला लागला होता. तेव्हा लिंग परिक्षण चाचणीला मान्यता होती. आम्हाला मुलगा होणारे हे माहीत होतं. मी डॉक्टरांना म्हणाले होते की माझ्या नवऱ्याला मुलगा हवाय. त्यामुळे तुम्ही प्लीज बाळाला वाचवा. माझा मृत्यू झाला तरी चालेल".