'स्टुडंट ऑफ द इयर' फेम कलाकाराने सोडलं अभिनय क्षेत्र, चाहत्यांना धक्का, आता करणार हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:26 IST2025-07-29T10:18:42+5:302025-07-29T10:26:46+5:30
'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. आता हा अभिनेता वेगळंच काम करणार आहे

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम कलाकाराने सोडलं अभिनय क्षेत्र, चाहत्यांना धक्का, आता करणार हे काम
'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. याच सिनेमातून तीन सुपरस्टार बॉलिवूडला मिळाले. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट या तिघांनीही या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. आज हे तिघेही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या सिनेमातील अनेक अभिनेत्यांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातील एका अभिनेत्याने अभिनय क्षेत्र सोडल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या
'स्टुडंट ऑफ द इयर'मधील या अभिनेत्याने सोडलं अभिनय क्षेत्र
'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमात सुडोची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता कायोज इराणीने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकल्याचा निर्णय सर्वांना सांगितला आहे. कायोजने 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमात वरुण-आलिया-सिद्धार्थच्या मित्राची भूमिका साकारली होती. कायोजने एका मुलाखतीत सांगितलं की, "माझा आता अभिनयक्षेत्रात परतण्याचा कोणताही विचार नाही. कॅमेरामागे काम करणं मला खूप चांगलं वाटतं. अभिनय क्षेत्र माझ्यासाठी नाही, याची मला जाणीव झाली आहे. मी नव्या सिनेमात काम करत नसलो तरीही मी तुम्हाला सिनेमा बनवताना दिसेल. तुम्हा सर्वांना मी निराश करतोय, याची मला शरम वाटतेय. अभिनय करणं हे माझ्या आवाक्यातील काम नाही."
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेता कायोज इराणी हा प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणींचा मुलगा आहे. कायोजने 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमात काम केलं. कायोजची भूमिका चांगली गाजली तरीही नंतर त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. कायोजने कार्तिक आर्यनच्या 'धमाका' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता कायोजने 'सरजमीन' या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलंय. या सिनेमात काजोल, इब्राहीम अली खान, पृथ्वीराज सुकुमारन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कायोजच्या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं तर अनेकांना धक्का बसला.