"गायींचे संवर्धन संपूर्ण भारतात राबवले पाहिजे" सोनू सूदने गोशाळेला केली २२ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:25 IST2026-01-13T11:23:34+5:302026-01-13T11:25:23+5:30
सोनू सूदने गायींच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.

"गायींचे संवर्धन संपूर्ण भारतात राबवले पाहिजे" सोनू सूदने गोशाळेला केली २२ लाखांची मदत
'गरिबांचा कैवारी' आणि 'मसीहा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाने सर्वांची मने जिंकली आहेत. गुजरातमधील एका गोशाळेला त्याने मोठी आर्थिक मदत केली असून, गायींच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
सोनू सूद आपल्या समाजकार्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. नुकतीच त्याने गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील संतलपूर येथील 'वराही गोशाळे'ला भेट दिली. यावेळी केवळ भेटच दिली नाही, तर गोशाळेच्या कामासाठी त्याने २२ लाख रुपयांची मोठी देणगी जाहीर केली आहे. गोशाळा व्यवस्थेची पाहणी करताना त्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ग्रामस्थांना संबोधित करताना सोनू म्हणाला, "काही गायींपासून सुरू झालेला हा प्रवास आज ७ हजार गायींपर्यंत पोहोचला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. गावकरी आणि विश्वस्तांचे योगदान कौतुकास्पद आहे. मला पुन्हा इथे यायला आणि तुमच्या घरी जेवण करायला नक्कीच आवडेल".
सोनू सूद म्हणाला, "या लोकांच्या कामाची मी कशाशीच तुलना करू शकत नाही, पण हे अद्भुत काम असेच सुरू राहावे, यासाठी आमच्या फाऊंडेशनकडून २२ लाख रुपयांचा छोटासा वाटा आम्ही उचलला आहे. गायींचे हे संवर्धन संपूर्ण भारतात राबवले पाहिजे". सोनू सूदच्या कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर, २०२५ मध्ये त्याचा 'फतेह' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.