अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- "मला आश्चर्य वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 11:16 IST2024-06-06T11:15:48+5:302024-06-06T11:16:28+5:30
सोनू निगम नावाचं अकाऊंट असणाऱ्या एका दुसऱ्याच व्यक्तीचं ट्वीट व्हायरल झालं होतं. यामुळे सोनू निगमला ट्रोल करण्यात आलं होतं. आता त्याने यावर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.

अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- "मला आश्चर्य वाटतं..."
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम काही दिवसांपासून चर्चेत आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी एक ट्वीट व्हायरल झालं होतं. सोनू निगम नावाच्या एका X अकाऊंटवरुन हे ट्वीट करण्यात आलं होतं. अयोध्येत राम मंदिर बांधूनही भाजपाला तिथे कमी मतं मिळाली. जिथे राम मंदिर बांधलं त्या फैझाबाद मतदारसंघातच भाजपाचा उमेदवार पडला. यावरुन हे ट्वीट करण्यात आलं होतं. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर सोनू निगमला ट्रोलही करण्यात आलं होतं. यावर आता सोनू निगमने स्पष्टीकरण दिलं आहे.
सोनू निगमच्या नावाने केलं होतं ट्वीट
“ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्थानक दिलं, ५०० वर्षांनंतर राम मंदिर उभारून दिलं, एका मंदिराच्या जोरावर अर्थव्यवस्था उभारून दिली, त्या पक्षाला अयोध्या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब आहे,” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं होतं. पण, हे ट्वीट गायक सोनू निगमने केलेलं नव्हतं. तर सोनू निगम नावाचं अकाऊंट असणाऱ्या एका दुसऱ्याच व्यक्तीने केलं होतं.
जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेलवे स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 4, 2024
शर्मनाक है अयोध्यावासियों!
ट्रोलिंगनंतर सोनू निगम काय म्हणाला?
याबाबत सोनू निगम हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हणाला, "मला आश्चर्य वाटतं की लोक आणि न्यूज चॅनेल्सही ही चूक कशी काय करू शकतात. त्या अकाऊंटवर जाऊन डिस्क्रिप्शन वाचायची तसदीदेखील कोणी घेतली नाही. सोनू निगम सिंग हे हँडलचं नाव आहे. तो क्रिमिनल वकील असल्याचंही डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. यामुळे मी सात वर्षांपूर्वी ट्वीटर बंद केलं. कोणत्याही संवेदनशील विषयावर मी माझं राजकीय मत मांडत नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो."
"या युजरकडून अनेकदा असे ट्वीट केले गेलेले आहेत. माझ्या हितचिंतकांकडून मला असे बरेच स्क्रीनशॉट्स आलेले आहेत. माझ्या टीमने त्याला संपर्क केला आहे. त्याच्या अकाऊंटचं नाव बदलण्यास आम्ही सांगणार आहोत. कारण, त्यामुळे तो मी आहे असं भासवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. आम्ही नक्कीच काहीतरी मार्ग काढू याचा मला विश्वास आहे," असंही सोनू निगम म्हणाला.