सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, गायले होते हे प्रसिद्ध गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:15 IST2020-05-08T17:12:00+5:302020-05-08T17:15:02+5:30
प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, गायले होते हे प्रसिद्ध गाणे
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सगळेच आपापल्या घरात बसून घरातल्यांसोबत वेळ घालवत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. सोशल मीडियावर सध्या अनेक जुने व्हिडिओ व्हायरल झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता तर सोनू निगमनेच हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. हा व्हिडिओ ३१ वर्षांपूर्वींचा असून यावेळी तो केवळ १६ वर्षांचा होता.
सोनू निगमने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, तालकटोरा मधील इंदौर स्टेडिअममध्ये नटराज पुरस्काराच्यावेळी मी हे गाणे गायले होते. हा व्हिडिओ १९८९ मधून असून मी नुकतेच स्टेज शो करायला लागलो होतो. हाच तो काळ होता ज्यावेळी माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. या व्हिडिओत माझ्यासोबत तुम्हाला अनू मलिक, शब्बीर कुमार यांना पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या सहा महिने आधी मी यादगार ए रफी ही प्रसिद्ध स्पर्धा जिंकलो होतो. त्यात मी चल उड जा रे पंछी हे गाणे गायलो होतो. त्यानंतर दोन महिन्यांनी शंकर जयकिशन यांच्या आठवणीत एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते, त्यात मी कहा जा रहाँ है तू हे गाणे गायले होते. या गाण्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.