सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:57 IST2022-03-10T15:56:59+5:302022-03-10T15:57:25+5:30
Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केले तेव्हा त्याचे सर्व कामकाज मॅट्रिक्स एण्टरटेन्मेंट पाहत होती. मात्र, अलीकडेच या शेरशाह स्टारने एजेन्सीशी असलेले ९ वर्षांचे संबंध तोडले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra)ने २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर मधून पदार्पण केल्यापासून त्याच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये ठसा उमटवण्यात यशस्वी झाला आहे. जेव्हा सिद्धार्थने पदार्पण केले तेव्हा त्याचे सर्व कामकाज मॅट्रिक्स एण्टरटेन्मेंट पाहत होती. मात्र, अलीकडेच या शेरशाह स्टारने एजेन्सीशी असलेले ९ वर्षांचे संबंध तोडून कामाचे व्यवस्थापन स्वतःच सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याच्या या निर्णयामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सिद्धार्थ मल्होत्राने धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याचा शेवटचा सुपरफिट चित्रपट शेरशाह ज्याने सिद्धार्थच्या अभिनयाला एक नवीन ओळख दिली तोही धर्मा निर्मितच होता. यामुळेच बरेच तर्क वितर्क लावले जात होते. तसेच सिद्धार्थ आता करण जोहरच्या धर्मा कॉर्नरस्टोन एजेन्सीमध्ये सामील होणार असल्याचेही बोलले जात होते, परंतु ही निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
एका जवळच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, “सिद्धार्थ यापुढे त्याचे काम कोणत्याही एजेन्सीद्वारे नाही तर स्वतःच सांभाळणार आहे. तो आणि त्याचा मार्गदर्शक करण जोहर यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. सिद्धार्थ त्याच्या विश्वासू आणि क्लोज टीमसह स्वतःचे व्यावसायिक काम सांभाळणार आहे . तो हे काम कोणालाही सोपवणार नाही आणि वैयक्तिकरित्या कामाची देखरेख करणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार मिशन मजनूमध्ये
सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो मोठ्या पडद्यावर रश्मिका मंदानासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे. साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या फ्रेश जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.