प्रेग्नंट कियारा अडवाणीचे फोटो काढत होते पापाराझी, सिद्धार्थ भडकला अन्...; पुढे काय झालं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:10 IST2025-04-24T13:10:33+5:302025-04-24T13:10:50+5:30
शिस्तीत राहा आणि मागे सरका! प्रेग्नंट कियारा अडवाणीचे फोटो काढणाऱ्यांवर भडकला सिद्धार्थ मल्होत्रा

प्रेग्नंट कियारा अडवाणीचे फोटो काढत होते पापाराझी, सिद्धार्थ भडकला अन्...; पुढे काय झालं पाहा
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणी ही जोडी लवकरच आई-बाबा बनणार आहेत. दरम्यान सिद्धार्थ आपल्या पत्नीची विशेष काळजी घेताना दिसत आहे. कामातून ब्रेक घेऊन सिद्धार्थ सतत कियारासोबत तिच्या सावलीप्रमाणे फिरताना दिसतो. दोघांचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा प्रचंड चिडलेला दिसला आहे. त्याचं हे रागवणं पापाराझींवरच आहे.
नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. दोघेही बाहेर जात असताना कियारा आधीच गाडीत जाऊन बसली होती, तर सिद्धार्थ मल्होत्रा गाडीत बसण्यासाठी पुढे येत होता. मात्र, त्याने बाहेर येताच गाडीसमोर जमलेल्या पापाराझींवर रागवण्यास सुरुवात केली. खरंतर कियारा अडवाणी तिचा बेबी बंप मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र, तिचा प्रेग्नंसी ग्लो सगळ्यांना दिसावा म्हणून मीडियाही तिची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत आहे.
सिद्धार्थ मीडियावर चिडला!
या व्हिडीओमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडताना दिसत आहे. प्रेग्नंट कियाराचे फोटो काढण्यासाठी पापाराझी तिच्या गाडीच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेच होते, इतक्यात सिद्धार्थ तिथे आला. यावेळीही कियारा आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सिद्धार्थने पापाराझींवर थोडासा आवाज चढवत ‘मागे सरका आणि थोडी शिस्त बाळगा’, असं म्हणत सज्जड दम भरला. यानंतर पापाराझी मागे सरकले. मात्र, त्यांना कियाराची एक झलक मिळवता आली.
नेटकऱ्यांनी केले कौतुक!
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील सिद्धार्थ मल्होत्राचे कौतुक करत आहेत. ‘सिद्धार्थ चांगला पती आणि पिता आहे’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर, ‘त्याने अगदी योग्य प्रकारे दम दिला’, ‘सिद्धार्थचं वागणं अगदी योग्य आहे. मीडियाने त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी आपली गुडन्यूज सगळ्यांसोबत शेअर केली होती. त्यांनी आपल्या प्रेग्नंसीची बातमी शेअर करताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या काळात सिद्धार्थ मल्होत्रा कियाराची खूप काळजी घेताना दिसत आहे. या जोडीने फेब्रुवारी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती.