शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय, 'सुपर डान्सर ५' मधील अप्सराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:52 IST2025-08-07T11:51:23+5:302025-08-07T11:52:34+5:30
शिल्पा शेट्टीचा कौतुकास्पद निर्णय

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय, 'सुपर डान्सर ५' मधील अप्सराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार
'सुपर डान्सर चॅप्टर ५' हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा एक लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो आहे. या शोमध्ये लहान मुलांचे धमाकेदार नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळतात. नृत्य सादरीकरणासोबतच या शोमध्ये काही भावूक क्षणही पाहायला मिळतात. नुकतंच 'सुपर डान्सर चॅप्टर ५'मध्ये असाच एक क्षण पाहायला मिळाला. लहानग्या अप्सराने तिच्या वडिलांसाठी खास नृत्य सादर केलं आणि तिचा संघर्ष ऐकून शिल्पा शेट्टी भावूक झाली. याच भावनेतून तिने अप्सराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा मोठा निर्णय घेतला.
'सुपर डान्सर चॅप्टर ५'च्या या आठवड्यात 'पप्पा स्पेशल' भाग होता. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या वडिलांसाठी खास डान्स परफॉर्मन्स दिला. त्यात स्पर्धक अप्सरा हिने तिच्या वडिलांसाठी नृत्य सादर केलं. अप्सराचे वडील रिक्षा चालवतात आणि खूप कष्ट करून घर चालवतात. ते पहिल्यांदाच स्टुडिओत येऊन आपल्या मुलीचा डान्स पाहत होते. अप्सराचा नृत्य पाहून ते खूप भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अप्सराच्या वडिलांनी सांगितले की ते तिच्या नृत्य प्रशिक्षणासाठी पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत. तेव्हा शोचे होस्ट परितोष त्रिपाठी यांनी अप्सराला मदत करण्यासाठी एक पाऊल उचललं आणि अप्सराच्या डान्स क्लासची एक वर्षाची फी भरणार असल्याचं सांगितलं.
यावेळी शिल्पा शेट्टी ही देखील भावूक झाली. शिल्पानं उभं राहून टाळ्या वाजवल्या. परितोष यांच्या निर्णयाचं कौतुक करत ती म्हणाली, "तू मलाही प्रेरणा दिली आहेस. एकापेक्षा दोन चांगले. जर तुम्ही एक वर्षासाठी तिची मदत केली तर मी ते दहावीपर्यंत करेन. अप्सराच्या अभ्यासाची जबाबदारी माझी आहे". हा खास भाग तुम्ही शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता सोनी टीव्ही आणि Sony LIV वर पाहू शकता.