शिल्पा शेट्टी बास्टियन रेस्टॉरंटमधून एका रात्रीत कमावते २-३ कोटी? सह-मालकाने सांगितल सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:14 IST2026-02-25T14:25:51+5:302026-02-25T15:14:55+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे कायम चर्चेत असतात.

शिल्पा शेट्टी बास्टियन रेस्टॉरंटमधून एका रात्रीत कमावते २-३ कोटी? सह-मालकाने सांगितल सत्य!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे कायम चर्चेत असतात. नुकतंच राज कुंद्राला बिटकॉईन स्कॅम प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. १५० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. एकीकडे EDचे छापे आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे शिल्पाचा पती राज कुंद्रा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. मात्र दुसरीकडे शिल्पाच्या 'बस्टियन' रेस्टॉरंटचा ब्रँड तितक्याच वेगाने यशाची शिखरे सर करत आहे. 'बॅस्टियन' हे मुंबईतील सर्वात आलिशान आणि सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण म्हणूनही ओळखलं जातं. नुकतंच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे बिझनेस पार्टनर रणजित बिंद्रा यांनी बॅस्टियनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते मुंबईतील एक अतिशय लोकप्रिय रेस्टॉरंट चेन बनण्यापर्यंतच्या प्रवासावर भाष्य केलंय.
'कर्ली टेल्स'शी बोलताना शिल्पा म्हणाली, "रणजित आणि माझी भेट झाली, याचा मला मनापासून आनंद आहे. २०१६ मध्ये मी जेव्हा तिथे केवळ एक ग्राहक म्हणून गेले होते, तेव्हाच आमची पहिली भेट झाली. तिथेच आमचं बोलणं सुरू झालं आणि त्याने मला वरळीत एक नवीन आऊटलेट उघडण्याबाबत सांगितलं. पुढे जाऊन ते आऊटलेट अत्यंत 'आयकॉनिक' ठरलं, पण त्यामागची खरी गोष्ट वेगळीच आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर, सुरुवातीला माझा यावर अजिबात विश्वास नव्हता. कारण ती जागा त्यावेळी अगदीच ओसाड होती. मात्र, रणजितला पूर्ण खात्री होती की, तो या जागेचं रूपांतर एका अव्वल दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये करू शकेल. आम्ही कोविडच्या आव्हानात्मक काळात हे हॉटेल सुरू केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने 'बस्टियन' ब्रँडचा उदय झाला. आज आमच्याकडे चार वेगवेगळ्या ब्रँड्सअंतर्गत एकूण आठ रेस्टॉरंट्स दिमाखात सुरू आहेत".
प्रत्येक टेबलचा टर्नअराउंड किती असतो? या प्रश्नाचं उत्तर देताना रणजित यांनी सांगितलं की, "आम्ही दुपारच्या जेवणासाठी संपूर्ण जागा उघडत नाही, कारण त्या वेळी फारसे लोक बाहेर पडत नाहीत. प्रामुख्याने किटी पार्टीसाठी किंवा छोट्या गाठीभेटीसाठी महिला येतात. फार मोठी गर्दी नसते. पण तरीही ते व्यवसायासाठी चांगलेच असते. टेबलनुसार, लंचचा सरासरी खर्च सुमारे १,५००, सनसेट सीटिंग (गोल्डन अवर) सुमारे २,००० आणि डिनरचा सरासरी खर्च सुमारे ३,००० येतो. रात्रीच्या वेळी 'बस्टियन'मध्ये सर्वाधिक गर्दी असते".
प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी हे रेस्टॉरंट दरोज २ ते ३ कोटी रुपये कमावते, असा खळबळजनक दावा केला होता. शोभा डे यांनी रेस्टॉरंट Bastianला 'कुबेराचा खजिना' असे संबोधलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, या रेस्टॉरंटमध्ये दररोज २–३ कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. त्यांच्या मते, येथे ग्राहक लेम्बोर्गिनी सारख्या महागड्या गाड्यांमधून येतात आणि प्रत्येक टेबलवर लाखो रुपयांचे बिल होते. वीकेंडला ही कमाई ३ कोटी रुपयांपर्यंत जाते, असेही त्यांनी सांगितले होते. या दाव्यावर रणजित बिंद्रा यांना थेट विचारण्यात आले की 'बास्टियन' दररोज २–३ कोटी रुपये कमावते का, तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले, "मला आशा आहे की हे खरं असेल. मला खात्री आहे की एक दिवस हे खरं होईल, त्यामुळे आशा ठेवूया". Bastianचा २–३ कोटींच्या रोजच्या कमाईचा दावा अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसला, तरी Bastian हे मुंबईतील सर्वात चर्चित आणि लक्झरी रेस्टॉरंट्सपैकी एक आहे.

सामान्य ग्राहक ते सह-मालक
शिल्पा शेट्टीनं २०१६ मध्ये मुंबईतील Bastian रेस्टॉरंटमध्ये एक सामान्य ग्राहक म्हणून भेट दिली होती. या भेटीदरम्यान, तिची भेट बास्टियन ब्रँडचे संस्थापक व रेस्टॉरंट मालक रणजित बिंद्रा यांच्याशी झाली. पुढे त्यांच्या मैत्री झाली आणि शिल्पानं रणजीत बिंद्रा यांच्याबरोबर या व्यवसायात भागीदारी केली. आता ती संपूर्ण भारतातील अनेक बास्टियन रेस्टॉरंट्सची सह-मालकीण आहे. रणजित बिंद्रा यांनी शिल्पा शेट्टींच्या सहभागामुळे व्यवसायात वेगळी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. "शिल्पामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे", असे ते म्हणाले. सेलिब्रिटींचा ब्रँडशी संबंध असणे फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे मोठे एक्सपोजर मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.