यशस्वी लग्नाचे 'हे' आहेत ३ मंत्र! २१ वर्षांच्या सुखी संसाराचं शरद केळकरने सांगितलं सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:19 IST2026-01-20T12:19:04+5:302026-01-20T12:19:36+5:30
शरद केळकर नेहमी पत्नी किर्तीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

यशस्वी लग्नाचे 'हे' आहेत ३ मंत्र! २१ वर्षांच्या सुखी संसाराचं शरद केळकरने सांगितलं सिक्रेट
शरद केळकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने मराठी, हिंदी आणि साऊथमध्येही काम केलं आहे.आपल्या भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा अभिनेता शरद केळकर सध्या त्याच्या 'तस्करी: द स्मगलर्स वेब' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. शरद खऱ्या आयुष्यात एक हळवा आणि परिपूर्ण 'फॅमिली मॅन' आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचे गुपित उघड केले आहे.
आजच्या काळात जिथे नाती टिकवणं कठीण झालं आहे, तिथे शरद आणि अभिनेत्री कीर्ती गायकवाड यांच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या यशस्वी प्रवासाबद्दल सांगताना शरद म्हणाला, "लग्नासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे प्रेम, आदर आणि वेळ. जर तुम्ही एकमेकांना या तीन गोष्टी दिल्या, तर नातं टिकवणं मुळीच कठीण नाही. आपण गोष्टी उगाच गुंतागुंतीच्या करतो, पण समंजसपणाने अनेक प्रश्न सुटू शकतात".
शरद आणि कीर्तीची भेट 'सात फेरे' या मालिकेच्या सेटवर झाली होती आणि २००५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. आपल्या जोडीदाराबद्दल बोलताना तो म्हणतो, "आम्ही दोघेही एकाच क्षेत्रातील अभिनय आहोत, हा आमच्यासाठी मोठा फायदा आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांचे काम आणि ओढाताण चांगली समजू शकतो. आजही आम्हाला लग्नाच्या पहिल्या दिवसासारखंच वाटतं". ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या शरदने २००४ मध्ये 'आक्रोश' मालिकेतून कारकिर्दीला सुरुवात केली. आज तो केवळ टीव्ही किंवा चित्रपटांपुरता मर्यादित नाही, तर तो एक जागतिक दर्जाचा डबिंग आर्टिस्ट देखील आहे.